Ketaki Chitale Comment On Balasaheb Thackeray Family: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळेने शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत एक वादग्रस्त विधान केलं आहे. ठाकरे कुटुंबातील मुलं मिशनरी शाळांमध्ये जातात असं म्हणत केतकीने इतरांना मराठीसंदर्भात ज्ञान सांगणारे स्वत:च्या मुलांना मिशनरी शाळांमध्ये का पाठवतात? असा सवाल केतकीने उपस्थित केला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने हे विधान केलं असून आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शालेय अभ्यासक्रमामध्ये त्रिभाषासूत्रीनुसार हिंदीचाही समावेश करण्यासंदर्भात शासन आदेश राज्य सरकारने जारी केले होते. मात्र त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कठोर विरोध केला. या दोन्ही पक्षांनी एकत्र मोर्चा काढण्याचं आवाहन केलं. मात्र त्यापूर्वीच शासनाने आदेश मागे घेत समिती स्थापन करत हा वाट काही महिन्यांसाठी टाळला. या निर्णयानंतर ठाकरे बंधुंनी संयुक्त मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दक्षिणेमध्ये स्वत:च्या भाषेसाठी आग्रही असलेले अनेक सेलिब्रिटी कशाप्रकारे इंग्रजी शाळांमध्ये शिकले आहेत याची यादीच वाचून दाखवली. बाळासाहेब ठाकरेही स्वत: इंग्रजी माध्यमात शिकल्याचं राज यावेळी म्हणाले.
एकीकडे मराठी आणि हिंदी वाद आता शांत होत असतानाच अभिनेत्री केतकी चितळेने थेट ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे. "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची नातवंडं एका कॅथलिक मिशनरी शाळेमध्ये का जातात? त्या ठिकाणी प्रार्थनासभेमध्ये आरती, पसायदान म्हटलं जात नाही. तिथे बिबलीकल हिम्स (बायबलमधील प्रार्थना) म्हटल्या जातात. तिथे त्यांना का शिकवलं जातंय?" असा सवाल केतकीने विचारला. तसेच ठाकरेंच्या नातवंडांना मिशनरी शाळेत शिकवलं जातं हे चालतं. मात्र "तुम्हाला अक्कल सांगत फिरणार ते की, मराठीमध्ये बोलणं किती गरजेचं आहे, अनिवार्य आहे. मराठी किती महत्त्वपूर्ण आहे सांगणार आणि स्वत:ची पोरं मिशनरी शाळेत शिकणार," असा टोला केतकीने लगावला.
केतकी चितळेने मराठी भाषेसंदर्भातही वादग्रस्त विधान केलं आहे. "आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे, जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे. हा जो काही क्रायटेरिया होता तो 2024 मध्ये काढण्यात आला. ज्यामुळे मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण मी याच्या विरोधात आहे, वैयक्तिक सांगायचं झालं तर. जर तुम्हाला करायचंच आहे, तर सगळ्याच भाषांने दर्जा द्या," असं केतकीने म्हटलं आहे.
"मराठीला अभिजात दर्जा मिळाला, त्याने काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे-दर्जा पाहिजे त्यामुळे इन्सिक्युरिटी आणखीन वाढते. मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी येत नाही. अरे! तो बोलेल नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना! तुम्ही तुमची स्वतःची इन्सिक्युरिटी दाखवत आहात. त्याने काय फरक पडतोय? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही.' असं केतकी चितळेनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीमध्ये म्हटलं आहे.