Oppose To 16600 Crore Project: राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाला विरोध करत स्थानिक रहिवाशांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. 16 हजार 600 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येत असलेल्या या भुयारी मार्ग प्रल्पाविरोधात स्थानिकांनी केलेल्या आंदोलनानंतर ठाणे पोलिसांनी मध्यस्थी करत एमएमआरडीए अधिकारी आणि रहिवाशांबरोबर आज सायंकाळी एक बैठक आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टचं काम सुरु झाल्यानंतर आता त्याला होणारा विरोध वाढताना दिसत आहे.
रहिवाशी आणि अधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये यामध्ये रस्ते मार्गाऐवजी मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग नेण्याबाबत चर्चा होणार आहे. याशिवाय, यासंबंधी मुंबई आयआयटीने पाहाणी करून केलेल्या अभ्यासाचा अहवालही अधिकाऱ्यांकडून सादर होण्याची शक्यता आहे. या बैठकीला एमएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अभियंता विशाल जांभळे हे उपस्थित राहणार आहेत. या वृत्तास स्थानिक रहिवासी नितीन सिंग, डॉ. लतिका भानुशाली यांनी दुजोरा दिला आहे. 13 जुलै 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं.
ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग मुल्लाबाग येथून रस्ते मार्गे पुढे नेण्यात येणार असून येथील संकुलांच्या प्रवेशद्वाराजवळच पथकर नाका उभारला जाणार आहे. त्यामुळे भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही, पण हा मार्ग रस्ते मार्गे नेण्याऐवजी मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. या संदर्भात रहिवाशांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली होती. त्यावेळी याबाबत मुंबई आयआयटीमार्फत अभ्यास करून पाहाणी अहवाल सादर करू असे आश्वासन दिले होते. मात्र, हा अहवाल अद्याप रहिवाशांपुढे सादर करण्यात आलेला नाही.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा हा भारतामधील शहरी भागातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे.
हा बोगदा बांधताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता अबाधित ठेवत काम केलं जाणार आहे.
या बोगद्यामधून सिग्नल रहित आणि विना थांबा प्रवास करता येणार आहे.
बोगद्याच्या उभारणीसाठी 16 हजार 600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
ठाणे-बोरिवलीदरम्यान प्रवासाचा वेळ 1 तासाने कमी होणार.
दोन्ही महत्वाच्या शहरांमधील अंतर केवळ 12 मिनिटांवर येणार.
या मार्गावर दररोज किमान 1 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज.
या बोगद्यामुळे कार्बन उत्सर्जनात दरवर्षी 1,50,000 मेट्रिक टनांची घट होईल असं सांगितलं जात आहे.