Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी...

मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई : मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पश्चिम आणि मध्य उपनगरातून तसंच कल्याण डोंबिवलीपासून अगदी बदलापूरपासून चाकरमानी कामानिमित्त मुंबईकडे मिळेल त्या वाहनाने निघालेत. रेल्वे गाड्या बंद असल्याने सर्वसामान्यांना वाहनांचाच आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी असल्याचं पाहायला मिळतंय. 

राज्य सरकारने खासगी कार्यालयातील उपस्थितीची मर्यादा १५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडीच आहे. रेल्वेसेवा अजूनही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे अतिरिक्त गर्दीचा भार रस्ते वाहतुकीवर पडतोय.  कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा, पनवेल, विरार येथून प्रवासी मुंबईच्या वेशीवर एसटीने येतात आणि पुढे बेस्टने कार्यालय गाठतात. यात अनेकांचे दिवसाचे चार ते सहा तास प्रवासात जात आहेत.

लॉकडाऊन असो किंवा सर्वसाधारण परिस्थिती तरी कल्याण फाटा आणि शीळ फाटा या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी असते. आता तर सर्व वाहतुकीची बंधनं उठवल्यानं वाहनांची संख्या आणखीनच वाढली आहे. यामुळे शीळ फाटा -कल्याण फाटा या भागातून प्रवास करणं खूप त्रासदायक होत आहे.

 तसंच, नवी मुंबईतून मुंबईकडे येताना सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालीय. वाशी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. वाहनांची रांग दोन ते तीन किलोमीटरच्या पुढे गेली असूनही टोल वसूली सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
 
मुंबई अनलॉक होतेय परंतु मुंबईची लोकल सामान्यांसाठी खुली नाही. परिणामी मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. खाजगी कार्यालयांतील उपस्थितीचं प्रमाण वाढवल्यानं आणि आता बसेसही अपुऱ्या पडत असल्यानं लोक मिळेल त्या वाहनानं कार्यालय गाठण्याचा प्रयत्न करतायत.

Read More