Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Ration Kit : आनंदाची शिधा' रखडली, दिवाळी किट दिवाळीनंतर मिळणार

राज्य सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी कीट देण्याचा निर्णय घेतला होता. 

Ration Kit : आनंदाची शिधा' रखडली, दिवाळी किट दिवाळीनंतर मिळणार

मुंबई :  दिवाळीची (Diwali) सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. घराघरात फराळ केला जातोय. बाजारपेठाही सजल्या आहेत. मात्र राज्य सरकारने केलेली घोषणा घोषणाच राहिली आहे. राज्य सरकारने गोर-गरिबांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 100 रुपयात रेशन कीट देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दिवाळी अवघ्या काही तासांवर आली असतानाही गोरगरिबांना आनंदाची शिधा मिळालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य रेशन कार्डधारकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. (maharashtra government diwali ration kit delay due to packaging ration card holder will get ration after diwali)

राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेला आनंदाचा शिधा नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी पाड्यांवर दिवाळीनंतर पोहचणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा नावाचं किट वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पॅकेजिंगमुळे आनंदाची शिधा वाटपाला उशीर झाला आहे. यामुळे हे कीट मिळण्यासाठी आणखी आठवडा लागणार आहे. 

या किटमध्ये एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चणाडाळ तर एक किलो पामतेल याचा समावेश आहे. साहित्य येण्यासाठी आणि त्याच्या पॅकिंगसाठी कमीत कमी आठवडाभराचा कालावधी लागेल. त्यामुळे गोरगरिबांची दिवाळी ही रेशन कीटविनाच जाणार आहे.  

दरम्यान गरिबांची दिवाळी गोड करण्याची केवळ घोषणाच आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली होती. तर मनसेनंही हे किट अजून रेशन दुकानांमध्ये पोहचलंच नसल्याचा आरोप केला होता. तसंच टेंडरमध्ये घोळ असल्याचा आरोपही मनेस नेते संदीप देशपांडेंनी केला. विरोधकांच्या या टीकेनंतरही रेशन कीटला वेळ लागल्याने सर्वसामान्य नाराज आहेत.

Read More