Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

Maharashtra Politics : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाहीये. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून मविआतील जागावाटपाचं घोडं अडलंय. काय आहे विदर्भ आणि मुंबईतील जागावाटपाचा वाद पाहुयात

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

मनश्री पाठक, झी मीडिया, मुंबई : महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागावाटपाचं भिजत घोंगड अजूनही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर (Seat Allocation) मुंबईत मविआचं मंथन सुरू आहे. मात्र अजूनही जागावाटपावर तोडगा निघालेला नसल्याची माहिती आहे. विदर्भ (Vidharbha) आणि मुंबईतील (Mumbai) जागांवरून मविआत वाद असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मविआत कोणत्या जागांवरून वाद आहे पाहुयात

विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

विदर्भातील भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपुरातल्या काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रावादी या दोन्ही पक्षांनी दावा केलाय. तर वर्धा, बुलढाणा, नागपूर जिल्ह्यांतल्या काही जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केल्यानं जागावाटपाचा वाद सुटलेला नाही.

तर दुसरीकडे मुंबईच्या काही जागांवरचा वादही मिटलेला नाही. मुंबईतील भायखळा, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या जागांवर तिढा असल्याची माहिती आहे. एकीकडे जागावाटावरून वाद असताना दुसरीकडे मात्र जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचं संजय राऊतांचा दावा आहे. तीन पक्षांचा जागावाटप अत्यंत सुरळीत सुरू आहे, आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही, एकेका जागेसाठी कदाचित जास्त वेळ लागतोय ते ठीक आहे कारण अशा काही जागा आहेत तिथे दोन किंवा तीन पक्षांचा दावा आहे अशा वेळेला आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो, दसऱ्याच्या खूप अगोदर आम्ही जागा वाटपाचा निकाल लावू असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

तर दुसरीकडे नाना पटोलेनी जागावाटवावरून मविआत तिढा नसल्याचं सांगून वेळ मारून नेली. आम्ही 288 जागांवर लढणार असल्याची सावध भूमिका त्यांनी घेतली. महाविकास आघाडीत सगळं सिस्टमॅटिक सुरू आहे. प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे, निवडून यायचे या मेरिट वर जागा द्यायचा असा निर्णय झाला आहे. एक दोन दिवस वेळ लागेल जागावाटप योग्य पद्धतीने केले जाईल, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकत्र येत आहोत, लवकरच जागावाटप जाहीर करू, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

विदर्भ आणि मुंबईतील जवळपास 25 ते 30 जागांवर मविआत वाद आहे. जवळपास 250 जागांवर मविआत एकमत झाल्याची माहिती आहे.. त्यामुळे आता विदर्भ आणि मुंबईतील जागांवर कसा तोडगा निघणार हे पाहावं लागणार आहे.

Read More