Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

टिप टिप बरसा पानी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिला गळका बंगला

Vijay Wadettiwar Banglow : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या सरकारी बंगल्यात चक्क पावसाचं पाणी गळतंय. एकीकडं मंत्र्यांच्या बंगल्यांवर करोडो रुपयांचा खर्च होतोय. तर दुसरीकडं विरोधी पक्षनेत्याला मात्र गळका बंगला देण्यात आलाय.

टिप टिप बरसा पानी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिला गळका बंगला

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सरकारने दिलेल्या बंगल्याला (Bunglow) चक्क गळती लागलीय. सी 6 प्रचितगड या त्यांच्या बंगल्याचं छत भर पावसात टपकू लागलंय. बंगल्यात पाणी पाणी होऊ नये, यासाठी बादल्या लावण्याची वेळ वडेट्टीवार यांच्यावर आलीय. गळका बंगला दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. वाहून जाऊ नये म्हणून वाचवा असा टाहो फोडण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. सरकार वाहून जायच्या तयारीत आहे. त्यामुळं निवासस्थाने गळत आहेत, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. सरकारचं फक्त भ्रष्टाचाराकडे (Corruption) लक्ष आहे. गळतीची तक्रार बऱ्याचदा केली. सरकारकडून केवळ लोकप्रिय घोषणा करून जुमला केला जातोय.मी काही कोट्यवधींचा खर्च केला नाही. कंत्राटदारांची बिले थकली आहेत अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केलीय.

यानिमित्तानं सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा उघड झालाय.. सरकारी बंगल्यांमध्ये कसं निकृष्ट दर्जाचं काम होतं, हेच पुन्हा समोर आलंय. एकीकडं विरोधी पक्षनेत्यांनी अशी केविलवाणी अवस्था. तर दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याची बाब फेब्रुवारी 2024 मध्ये पुढं आली होती.

मंत्र्यांच्या बंगल्यावर करोडोंचा खर्च

अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर 19 लाख 89 हजार रुपये

सुधीर मुनगंटीवारांच्या पर्णकुटी बंगल्यावर 1 कोटी 50 लाख रुपये

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या रॉयलस्टोनवर 1 कोटी 58 लाख रुपये

गुलाबराव पाटलांच्या जेतवनवर 1 कोटी 15 लाख रुपये

दीपक केसरकरांच्या रामटेकवर 75 लाख 42 हजार रुपये

तानाजी सावंतांच्या लोहगड बंगल्यावर 87 लाख 46 हजार रुपये

अतुल सावेंच्या शिवगडावर 1 कोटी 4 लाख रुपये

शंभूराज देसाईंच्या पावनगडावर 83 लाख 24 हजार रुपये

चंद्रकांत पाटलांच्या सिंहगडवर 52 लाख 37 हजार रुपये

राहुल नार्वेकरांच्या शिवगिरीवर 42 लाख रुपये

विजयकुमार गावितांच्या चित्रकूटवर 1 कोटी 54 लाख रुपये

उदय सामंतांच्या मुक्तगिरीवर 1 कोटी 16 लाख रुपये

संदीपान भुमरेंच्या रत्नसिंधूवर 37 लाख 26 हजार रुपये

दिलीप वळसे पाटलांच्या सुवर्णगडवर 73 लाख रुपये

अब्दुल सत्तारांच्या पन्हाळगडवर 50 लाख रुपये

अदिती तटकरेंच्या प्रतापगड बंगल्यावर 35 लाख 99 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आलीय..
 
मंत्र्यांच्या बंगल्यावर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला. या बंगल्यांची आता नेमकी काय अवस्था आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे... वडेट्टीवारांप्रमाणेच मंत्र्यांचेही बंगले गळत नाही ना? हे पाहायला हवं... नाही तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी मंत्र्यांची अवस्था व्हायची.

Read More