MHADAs lottery: मुंबईत स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण शहरातील घरांच्या वाढत्या किंमती पाहता ते आटोक्याबाहेर गेलंय. यामुळे अनेकजण मुंबईबाहेर घरासाठी प्रयत्न करतात. अशावेळी म्हाडाच्या लॉटरीचा दिलासा घर घेणाऱ्यांसाठी असतो. या लॉटरीतून इच्छुकांना परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध होतं. तुम्हीदेखील मुंबईत घर घेण्यासाठी धावपळ करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे. यामुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे ही लॉटरी दिवाळीपूर्वी लागणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबईत सुमारे 5 हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लवकरच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. म्हाडाने नेमलेली समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचेदेखील नुकसान होणार नाही यादृष्टीने अभ्यास करणार आहे. पुढील तीन महिन्यांत ही समिती आपला अहवाल उपाध्यक्षांकडे सादर करणार असून त्यानंतर तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.
सध्या जमिनीचा खर्च, बांधकाम खर्च आणि आस्थापन खर्च आदींचा विचार करून म्हाडाच्या घराच्या किमती निश्चित केल्या जातात. अत्यल्प आणि अल्प गटातून म्हाडा शून्य टक्के नफा घेते. मध्यम उत्पन्न गटातून दहा टक्के तर उच्च उत्पन्न गटातून 15 टक्क्यांपर्यंत नफा घेऊ शकते. म्हाडाने एखादा भूखंड दहा-बारा वर्षांपूर्वी घेतला असेल तर त्या भूखंडाच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च केला असेल तर त्या खर्चाचादेखील घराच्या किमतीत समावेश केला जातो. त्यामुळे साहजिकच घरांच्या किमती वाढतात. एखाद्या भूखंडावर उशिरा इमारत बांधली गेली असेल तर त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांनी का सहन करायचा? प्राधिकरणाचे नुकसान न होता सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळाले पाहिजे यादृष्टीने घरांच्या किमती ठरवताना कोणत्या गोष्टी अंतर्भूत करायच्या आणि कोणत्या नाही याचा समिती अभ्यास करणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
म्हाडाच्या धोरणानुसार 300 चौरस फुटापर्यंतची घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 450 चौरस फुटापर्यंतची घरे अल्प उत्पन्न गटासाठी, 600 चौरस फुटापर्यंतची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी तर 900 चौरस फुटापर्यंतची घरे उच्च उत्पन्न गटासाठी देण्यात येतात. उपनगरातील 300 चौरस फुटाच्या घराची किंमत आणि तेवढ्याच क्षेत्रफळाच्या दक्षिण मुंबईतील घराची किंमत यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. त्यामुळे घराच्या क्षेत्रफळाऐवजी त्याच्या किमतीनुसार उत्पन्न गट ठरवता येतील का, याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.