ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई : परप्रांतीय महाराष्ट्रातल्या वाढत्या गुन्हेगारीचं मूळ असल्याचा आरोप राज ठाकरे गेल्या काही वर्षांपासून करतायेत. गेल्या काही दिवसातले गुन्हे पाहिल्यास या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय गुन्हेगार आहेत. राज ठाकरेंनी तेव्हा केलेले आरोप राजकीय स्वरुपाचे नसून ते वस्तूस्थितीदर्शक असल्याचं अधोरेखित होऊ लागलं आहे.
गेल्या काही दिवसांत कल्याण- उल्हासनगरमध्ये परप्रांतीयांच्या मुजोरीची उदाहरणं पाहा. राज ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून जे बोलतायेत, ते आज घडू लागलंय. महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण धोकादायकरित्या वाढू लागल आहे. गुन्हे करणा-यांमध्ये परप्रांतीयांची संख्या मोठी असल्याची माहिती आहे. कल्याणमध्ये परप्रांतीयानं रुग्णालयात काम करणा-या तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारलं आहे. उल्हासनगरमधील एक आरोपी जेलमधून सुटल्यानंतर त्याची वरात काढण्यात आली. तिस-या घटनेत विनयभंगातील आरोपीनं पीडितेच्या घरासमोर फटाके फोडले. या सगळ्या घटनांमधील आरोपी परप्रांतीय आहेत. राज ठाकरे जे सुरुवातीला बोलले होते त्यावर अनेकांचा विश्वास बसला नव्हता. राज ठाकरे राजकीय आरोप करत असल्यासारखं इतर पक्षांना वाटत होतं पण त्यातला खरा धोका आता समोर येऊ लागला आहे. राज ठाकरेंनी यापूर्वीही दिल्लीतल्या वाढलेल्या गुन्हेगारीला परप्रांतीय कारणीभूत असल्याचा आरोप शीला दीक्षित यांनी केल्याचा दाखला दिला होता.
नुकताच नालासोपा-यात एका महिलेनं मित्राच्या मदतीनं नव-याचा खून करुन त्याचा मृतदेह घरातच पुरला होता. महाराष्ट्राचं वेगानं गुन्हेगारीकरण होत असून बिहार-उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीचा पॅटर्न महाराष्ट्रातही सुरु झाल्याचं खेदानं म्हणावं लागतंय....गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीय गुन्हेगारांची गुन्हा महाराष्ट्रात करा आणि यूपी बिहारमध्ये पळून जा ही मोडस ऑपरेंडी पोलिसांची डोकेदुखी ठरलीये. तिथं आरोपींच्या शोधात गेलेल्या पोलिसांवर हल्लेही होतात.हे सगळं पाहता महाराष्ट्रातली वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासनाला विशेष उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अन्यथा पुढच्या काळात महिलांसाठी, सामान्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहे असं म्हणताच येणार नाही.