देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात सध्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) सुरू आहे. महाराष्ट्राला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक आणि सांस्कृतिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सव सुरू झाला. मात्र दिवसेंदिवस या गणेशोत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलताना पाहायला मिळत आहे. खास करून मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाला आहे. अशातच मनसे (MNS) नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी केलेल्या ट्वीटने सगळ्याचं लक्ष्य वेधलं आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच ढोल ताशा पथकांची तयारी सर्वत्र पाहायला मिळते त्यातून होणाऱ्या आवाजावरही अनेकदा सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळातील सर्वत्र मोठ मोठ्या आवाजात स्पीकर सुरू असतात. मुंबईतल्या अनेक प्रसिद्ध आणि नामचीन मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून देखील अनेक गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. या गर्दीचे नियोजन अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही. यातूनच चेंगराचेंगरी सारख्या धक्काबुक्कीच्या घटना घडत जातात.
पाद्यपूजन, आगमन सोहळे, विसर्जन मिरवणूक आणि गणेशोत्सव दरम्यानचे कार्यक्रम याला मुंबईत खास करून तोबा गर्दी होत असते. यात तरुणाईची संख्या मोठी असते. महत्त्वाचे म्हणजे सेल्फी बहाद्दर आणि फोटोग्राफी याकडे तरुणाईचा मोठा ओढा असतो. स्वातंत्र्यापूर्वी एका विशिष्ट हेतुने सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव गोंगाट आणि चेंगराचेंगरीत गुदमरतोय का? आपल्या देवदर्शनातला भक्तिभाव आणि संस्कृती तिथे सेल्फीच्या गर्दीत हरवली आहे का? आपलं काहीतरी चुकतंय का? असं ट्विट करत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी या सगळ्या विषयाकडे लक्ष वेधले आहे.
स्वातंत्र्यापुर्वी एका विशिष्ट हेतुने सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव गोंगाट आणि चेंगराचेंगरीत गुदमरतोय का ?
— Nitin Sardesai (@1nitinsardesai) September 23, 2023
आपल्या देवदर्शनातला भक्तिभाव आणि संस्कृती तिथे Selfie च्या गर्दीत हरवली आहे का ?
आपलं काहीतरी चुकतंय का ?
त्यामुळेच समाज प्रबोधन आणि क्रांती करणारा हा गणेशोत्सव आता झगमगाट, रोषनाई, कानठळ्या बसवणारा आवाज, फ्लेक्स,बॅनर बाजी आणि सेल्फी क्लिक मध्ये हरवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.