आज शनिवारी वरळी डोम येथे मनसे शिवसेना म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणार आहेत. प्राथमिक शाळांमधील हिंदी भाषेच्या सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा आदेश शासनाने रद्द केल्यामुळे आज विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.
या विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांनीही उपस्थिती लावली आहे. यावेळी अभिनेता भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीत उपस्थित आहे. यावेळी या मराठी कलाकारांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली.
कोण येतंय याकडे मी विशेष लक्ष ठेवणार आहे. हे राज ठाकरे म्हणाले होते. पण मी येणारच होतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठीची गळचेपी होत आहे. ही गळचेपी रोखण्यासाठी मी आणि माझ्यासह माझे इतर कलाकार सहकारी देखील उपस्थित राहणार आहेत. मराठी माणसाने एकत्र येणे गरजेचे आहे, अशी माहिती अभिनेता भरत जाधवने दिली आहे.
अजून खूप मराठी माणसांनी एकत्र येणं बाकी आहे. मराठी-मराठीमध्ये खूप गोष्टी वाटल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे आणि तो येत आहे. आज मुळातच सांगण्यात आलं आहे की, नो झेंडा ओनली अजेंडा... तर यामधूनच सगळ्या गोष्टी कळत आहेत. आम्ही कलाकार इथे मराठीसाठी आलो आहोत. मराठीच्या विजयासाठी येथे आलो आहोत. मला संपूर्ण महाराष्ट्रात जो क्षण अनुभवायचा होता तो आज अनुभवता येणार म्हणून मी येथे आले आहे.
मराठी सिनेमांना स्क्रीन न मिळणे किंवा मराठी सिनेमांचे इतर कोणतेही प्रश्न असतो तेव्हा कलाकार शिवतीर्थावर येतात. पण जेव्हा मराठी भाषेचा मुद्दा असेल तेव्हा कलावंत पुढे येताना दिसत नाहीत. हा प्रश्न मला पण आहे. मी यावर वैयक्तिक बोलू शकते आणि मी येऊन माझी उपस्थिती दर्शवली आहे.
मराठीचा विजय साजरा करायला आले आहे. महाराष्ट्र हा दृष्य पाहण्यासाठी आसुसलेला होता. त्यामुळे मी येथे आले आहे.
मराठीच्या मुद्द्यावर कलाकार आपली प्रतिक्रिया कायमच मांडत असतात. मराठी कलाकारांच्या मागे कायमच ठाकरे बंधू राहीले आहेत. आणि आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच मराठी कलाकार त्याच्या त्याच्या पद्धतीने सोशल मीडिया किंवा कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. येथे येणे हा एक आनंद आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली आहे.