Mulund Bandh: धारावी पुनर्वसन योजनेंतर्गत अपात्र रहिवाशांकरिता गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीतील मिठागरांचे भूखंड हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याला मुलुंडमधील स्थानिकांचा मोठा विरोध आहे. याच निर्णयाविरोधात आज मुलुंड बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने आज मुलुंड बंदची हाक देण्यात आली असून सकाळपासूनच उपोषणाला सुरुवात होणार आहे.
काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी मुलुंडमध्ये होणाऱ्या धारावी प्रकल्पाच्या विरोधात सकाळी उपोषणाला बसणार आहेत. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडही या आंदोलनानिमित्त आज मुलुंडमध्ये येणार आहेत. धारावीतील रहिवाशांचे मिठागरांच्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत पुनर्वसन होऊ देणार नाही, असा इशारा यापूर्वीच मुलुंडवासीयांनी दिला आहे. मुलुंडमधील मिठागरांचे भूखंड हस्तांतरित करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवत त्याविरोधातील याचिका दोन महिन्यांपूर्वीच फेटाळली होती.
मुलुंडमधील मिठागराच्या जागेवर धारावीकरांसाठी घरे बांधण्यास विरोध कायम असून घरे उभारण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा देत जनआंदोलन आणखी तीव्र केले जाणार असल्याचे स्थानिकांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. मानवी साखळी, निदर्शने, उपोषण, जनजागृती मोहीम अशा विविध आंदोलनांच्या माध्यमातून विरोध केला जाईल, असेही मुलुंडमधील नागरी संघटनांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. एकीकडे रस्त्यावर उतरुन आंदोलनं करताना दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार असून तेथे आपल्याला निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास येथील नागरिकांना आहे.
PAP हटाव मुलुंड बचाव pic.twitter.com/LRQ5TFaiUK
— KAILAS KISAN BOMBLE ( INC ) (@kailasbomble) July 28, 2024
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेली पात्रता सर्वेक्षणाची प्रक्रिया 12 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर सर्वेक्षण करणारी पथके रहिवाशांच्या घरोघरी भेट देणार नाहीत. त्यामुळे ज्या रहिवाशांनी कागदपत्रांसह डीआरपी हेल्पलाइनवर संपर्क साधून डीआरपी किंवा एनएमडीपीएल कार्यालयात भेट दिली आहे, त्यांचाच तपशील सर्वेक्षण कागदपत्रांमध्ये समाविष्ट केला जाईल.
जे झोपडपट्टीधारक वैध कागदपत्रांसह डीआरपी हेल्पलाइनवर संपर्क साधतील आणि डीआरपी किंवा एनएमडीपीएल कार्यालयात येतील, त्यांना अद्यापही या सर्वेक्षण प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी आहे. ती आतापर्यंत 87 हजारांहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर एक लाखाहून अधिक झोपड्यांना युनिक नंबर दिले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, 1.20 लाख झोपड्या नकाशांवर दर्शविल्या असून, त्यांचे धारावी, कुर्ला, मुलुंड, कांजूरमार्ग, भांडुप आणि मुक्तेश्वर आदी ठिकाणी पुनर्वसन केले जाईल.