Mumbai Crime News: मुंबईतील मालाड येथे एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. प्रियकराची हत्या करुन त्याच्याच मोबाईलवरुन आत्महत्येचा मेसेज केला. पोलिसांना व कुटुंबीयांना गुंगारा देण्यासाठी प्रेयसीनेच हा कट रचल्याचे समोर आले आहे. मात्र दिंडोशी पोलिसांनी या कट उधळून लावला असून महिलेला जयपूरमधून अटक केली आहे.
मालाड पूर्वेकडील एका हॉटेलमध्ये महिलेने प्रियकराची गळा दाबून हत्या केली. मात्र त्यानंतर आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून तिनेच हत्या केल्यानंतर त्याच्याच मोबाइलवरुन आत्महत्येचा बनावट मेसेज पाठवत त्याच्या कुटुंबीयांची व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या महिलेने केला. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत बरकत राठोड या महिलेला जयपूरमधून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला ही नात्याने त्याची मेहूणी लागत होती.
मीरा रोडचे रहिवासी आय. मन्सूरी (४५) मालाडच्या ओर्लेम परिसरात इंटिरियर डेकोरेटर म्हणून व्यवसाय करत होते. रविवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मन्सुरीच्या मोबाइलवरून एक मेसेज आला. त्यात लिहिले होते, 'मी, मंसुरी पूर्ण जाणीवपूर्वक जाहीर करतो की, बरकत आणि माझ्यामध्ये कोणताही संबंध नाही. हे सर्व माझ्या पत्नीचे षडयंत्र आहे, जिने मला आणि बरकत दोघांनाही बदनाम करण्यासाठी हे रचले आहे. या सर्व अफवांसाठी माझी पत्नी जबाबदार आहे आणि तिच्यामुळेच मी आत्महत्या करत आहे.' तो मेसेज वाचल्यानंतर त्यांच्या मुलाने नयानगर पोलिस स्टेशनला धाव घेतली आणि वडिलांचा शोध सुरू केला.
रविवारी संध्याकाळी हॉटेलच्या खोलीत मन्सुरी यांचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्यानंतर दिंडोशी पोलिस ठाण्याच्या पथकाने पंचनामा करत, मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अहवालात मन्सुरीचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याची पुष्टी झाली. त्यात त्याच्या मानेवर नखांचे निशाण आणि दाबाच्या जखमाही आढळून आल्या, यामुळे आत्महत्या होण्याची शक्यता पोलिसांकडून नाकारण्यात आली.