Mumbai Crime News: मेरठ येथील सौरभ राजपूत हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मुंबईतदेखील अशीच एक घटना घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. मुंबईतील गोरेगाव येथे ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेसह साथीदाराला गोरेगाव पोलिसांनी अटक असून दोन जण फरार झाला असून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करीत आहेत
प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्यामुळं त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दिडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेसह तिच्या साथीदारालाही अटक केली. आरोपी प्रियकर आणि त्याचा दुसरा मित्र फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिंडोशी पोलिसांच्या माहितीनुसार, रंजू चौहान (२९, बंजारीपाडा, गोरेगाव पूर्व) हिने तिचा पती चंद्रशेखर चौहान (३५) याची हत्या करण्यासाठी आपल्या प्रियकराबरोबर कट रचला होता.
चंद्रशेखर चौहानहा फिल्म सेटवर कामगार म्हणून काम करत होता. चंद्रशेखर घरी बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सकाळी बराच वेळ चंद्रशेखर झोपेतून उठला नाही, तसेच तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता, अशी माहिती रंजू चौहान हिने पोलिसांना दिली.
रंजू हिने दिलेली माहिती पोलिसांनी संशयास्पद वाटल्याने त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. पोलिसांनी महिलेचा मोबाइल आणि कॉल रेकॉर्डिंग तपासल्यानंतर या हत्याकांडाचा सुगावा लागला. रंजूने पोलिसांना सांगितले होते की, आपण रात्री 1.30 वाजता झोपलो होतो. मात्र पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले असता मोबाईलवर रात्री 1.30 नंतर फोन आले होते. पोलिसांनी अघिक तपासणी केली असता ती दोन व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते.
पोलिसांनी रंजूला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने हत्येची कबुली दिली आहे. तिने प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीला गळा दाबून ठार केले आहे. गुन्ह्याच्या वेळी आरोपी महिला घटनास्थळी उपस्थित होती. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस तपास करत आहेत.