Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

गरिबीला कंटाळून किडनी विकायला गेले आणि 3 लाखांना फसले; मुंबईत मराठी माणसासोबत धक्कादायक प्रकार!

Mumbai cyber Fraud: आर्थिक संकटात सापडलेले नागवेकर हे मुंबईतील दहिसर येथील झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीत राहतात

गरिबीला कंटाळून किडनी विकायला गेले आणि 3 लाखांना फसले; मुंबईत मराठी माणसासोबत धक्कादायक प्रकार!

Mumbai cyber Fraud: इंटरनेटचं जाळ जगभरात वेगाने पसरतय. यामुळे अनेक चांगल्या गोष्टी होत असल्या तरी दुसरीकडे सायबर गुन्हेगारीदेखील फोफावली आहे. अशिक्षिपणाचा फायदा घेऊन सायबर फ्रॉड लोकांची लाखोंची लूट करतायत. मुंबईत राहणाऱ्या 45 वर्षे व्यक्तीला याचा जोरदार फटका बसलाय. गरिबीमुळे त्रस्त झाल्याने त्यांना आपली किडनी विकायची होती पण त्यांना 3 लाखांचा गंडा घालण्यात आला. 

मुंबईत सायबर ठगांनी प्रशांत नागवेकर या व्यक्तीची सुमारे 3 लाख रुपयांची फसवणूक केली. गरिबी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या प्रशांत यांनी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपली किडनी विकण्याचा विचार केला. पण सायबर ठगांच्या जाळ्यात अडकून त्याने 2.95 लाख रुपये गमावले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

15 हजार पगार

आर्थिक संकटात सापडलेले नागवेकर हे मुंबईतील दहिसर येथील झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीत राहतात. त्यांच्यासोबत पत्नी, मुलगा, आई आणि भाऊ असा परिवार एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतो. त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामे करते. तर प्रशांत स्वतः अंधेरी पूर्व येथील इंडोसिटी इन्फोटेक लिमिटेडमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करतात. त्यांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये मासिक पगारापैकी 10 हजार रुपये भाड्यासाठी आणि उरलेले 5 हजार रुपये घरखर्चासाठी खर्च होतात. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणींनी घेरलेल्या प्रशांत यांना आपल्या 10 वर्षीय मुलाला चांगल्या शाळेत शिक्षण द्यायचे होते आणि स्वतःचे घर घेण्याचे स्वप्नही होते. कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची भीती असल्याने त्यांनी कर्ज घेण्याऐवजी अवयव विक्रीचा पर्याय निवडला.

किडनी विक्रीच्या नादात फसवणूक

प्रशांत यांनी आपली किडनी विकण्यासाठी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि डार्क वेबवर एका जाहिरातीत दिल्लीतील रुग्णालयाशी संबंधित संपर्क क्रमांक मिळाला. त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला आणि किडनी विक्रीची इच्छा व्यक्त केली. ठगांनी त्यांची वैयक्तिक माहिती घेतली आणि लवकरच परत संपर्क साधण्याचे आश्वासन दिले. 16 जून 2025 रोजी प्रशांतला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. कॉलरने त्यांना किडनीच्या बदल्यात 1 कोटी रुपये मिळतील, पण त्यासाठी शस्त्रक्रियापूर्व चाचण्यांसाठी 2.95 लाख रुपये जमा करावे लागतील, असे सांगितले. 

इतकी मोठी रक्कम नसल्याचे सांगताच ठगांनी त्याला हप्त्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले आणि तीन वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती दिली. पैशाच्या लालसेने आंधळा झालेल्या प्रशांत यांनी ऑनलाइन अॅप्सद्वारे कर्ज काढून 2.95 लाख रुपये जमा केले.

फसवणुकीचा उलगडा आणि पोलीस तपास

पैसे जमा झाल्यावर ठगांनी आणखी 1.30 लाख रुपये मागितले. यावेळी प्रशांत यांना शंका आली आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ठगांचा फोन बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रशांत यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने गरिबी आणि हताशपणामुळे चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना सायबर ठग कशा प्रकारे लक्ष्य करतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Read More