Mumbai Local Mega Block : रविवार 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्तानं अनेक मंडळी नातलगांकडे जाण्याच्या बेत आखतील, मित्रमंडळींना भेटण्याच्या निमित्तानं बरेचजण घराबाहेर पडतील. या साऱ्यामध्ये प्रवास करत असताना वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी म्हणून अनेकजण रेल्वेमार्गानं प्रवास करण्याचा पर्याय निवडतील. मात्र यंदाच्या रविवारी हा पर्यायसुद्धा तुमची फारशी मदत करणार नाहीय.
रविवारी गुढीपाडव्याच्या निमित्तानं मध्य रेल्वेनं प्रवास करणं महागात पडू शकतं. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप, डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान मुलुंडहून सकाळी 10.43 ते दुपारी 3.53 पर्यंत सुटणाऱ्या धिम्या/सेमी जलद गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. ज्यामुळं कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर प्रवाशांना रेल्वे सेवा उपलब्ध नसेल.
हार्बर मार्गावरही कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. जिथं सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी सीएसएमटी आणि वाशी/बेलापूर/पनवेल स्थानकांदरम्यानच्या सेवा सकाळी 10.34 वाजल्यापासून ते दुपारी 3.36 पर्यंत रद्द करण्यात येईल. यादरम्यान सीएसएमटी - कुर्ला आणि पनवेल वाशी विभागांवर विशेष उपनगरीय रेल्वेगाड्यांची सुविधा सुरू राहील. ठाणे -वाशी/नेरुळ स्थानकांच्या दरम्यान मात्र प्रवाशांना प्रवासाची मुभा मिळणार आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वेप्रमाणंच पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक घेण्यात येणार असून सांताक्रुझ ते माहीम स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 1 ते रविवारी पहाटे 4.30 कालावधीत डाऊन धिम्या मार्गावर तर 12.30 ते 4.30 या कालावधीत अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक लागू असेल. यादरम्यान लोअर परळ, माहीम आणि खार रोड या स्थानकांसह अप स्लो मार्गावरील ब्लॉक कालावधीत महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसेल.