Mumbai Local News : रविवार म्हटलं की सुट्टीच्या दिवसाचे बेत आले आणि सुट्टीच्या दिवसांच्या याच बेतांमध्ये भटकणंही आलं. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरांमध्ये अशा सुट्टीच्या दिवशी रेल्वे हेच प्रवासाचं उत्तम साधन असलं तरीही रविवार मात्र अपवाद ठरू शकतो. त्यामुळं रविवारी मुंबईत एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जायचा विचार असेल आणि त्यातूनही रेल्वेनं प्रवास करण्याची इच्छा असेल तर आताच काही पर्याय चाचपडून पाहा. कारण, पश्चिम रेल्वे वगळता मध्य आणि हार्बर रेल्वेनं इच्छा असतानाही प्रवाशांना प्रवास करता येणार नाहीय.
दर रविवारप्रमाणं 16 मार्च (रविवार) या दिवशीसुद्धा रेल्वेच्या वेळापत्रकांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेनं मात्र प्रवाशांना दिलासा दिला असून इथं मेगाब्लॉक लागू नसेल. ज्यामुळं पश्चिम रेल्वेच प्रवाशांची तारणहार ठरू शकते.
रविवारी, देखभाल दुरूस्ती आणि इतक काही तांत्रिक कामांच्या धर्तीवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. ज्यामुळं रेल्वेगाड्या वेळापत्रकातील वेळेपेक्षा किमान 10 मिनिटं उशिरानं धावतील.
अधिकृत माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी (CSMT) आणि दादर स्थानकातून सुटणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण ते ठाणे-विक्रोळीदरम्यान पाच आणि सहा क्रमांताच्या मार्गिकेवरून चावलण्यात येणार आहेत.
रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक लागू असेल. यादरम्यान, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणाप आहे. ब्लॉक दरम्यान वाशी ते पनवेल या स्थानकांमधील संपूर्ण लोकल वाहतूक बंद राहील. तर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा नेरुळ ते पनवेल दरम्यान बंद असेल. दरम्यान काळात सीएसएमटी ते वाशी या प्रवासासाठी विशेष लोकल चालविण्यात येतील.
रेल्वेची कमी झालेली संख्या पाहता प्रवाशांना यादरम्यान काही स्थानकांमध्ये गर्दीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं रविवारच्या प्रवासाचं पूर्वनियोजन केलेलं उत्तम.