Mumbai Local News : मुंबई शहराला सध्या उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असला तरीही इथं सुट्टीच्या दिवशी येणाऱ्यांचा आकडा मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशा या मुंबई शहरात रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांना शनिवार आणि रविवारी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रेल्वे विभागाच्या एका निर्णयामुळं अनेकांच्याच सुट्टीच्या दिवसांदरम्यान मुंबई लोकलमध्ये प्रचंड गर्दीचे संकेत मिळत आहेत.
शनिवार आणि रविवार या दिवशी शहरातील अनेक कार्यालयांना रजा असली तरीही रेल्वेनं प्रवास करणारा एक मोठा प्रवासी वर्ग मुंबईत बाहेर पडतो. या आठवड्यामध्ये मात्र या सर्वच मंडळींना प्रवासादरम्यान काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण ठरणार आहे तो म्हणजे रेल्वे मार्गांवर लागू करण्यात आलेला मेगाब्लॉक.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीनं दोन विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी एक ब्लॉक पाच तासांचा आणि दुसरा दहा तासांचा असून, पूर्व आणि पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंग (NI) कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरील प्लॅटफॉर्म विस्तार प्रकल्पाचा एक भाग म्हणून हा ब्लॉक घेण्यात येत असून, बेट प्लॅटफॉर्म 12 आणि 13 वर 24 डब्यांच्या गाड्या असतील असं सांगण्यात येत आले.
पहिला ब्लॉक शुक्रवारी रात्री 11.30 वाजता सुरू होऊन शनिवारी 4:30 वाजता सीएसएमटी ते भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर संपेल. त्याचप्रमाणे दहा तास चालणारा दुसरा ब्लॉक शनिवारी रात्री 11वाजून 15 मिनिटांनी सुरू होऊन रविवारी सकाळी 9.15 वाजता पूर्ण होईल.
ब्लॉक कालावधीत मुळे सीएसएमटी ते भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गावरील लोकलसह हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा दरम्यानच्या रेल्वे सेवा प्रभावित असतील. तर, मध्य मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहतील. ब्लॉकची एकंदर व्याप्ती पाहता प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचं नियोजन करत पर्यायी मेट्रो, बेस्ट बस किंवा वाहतुकीचे खासगी पर्याय निवडण्याचा सल्ला यंत्रणांनी दिला आहे.