Mumbai Local Train Update: मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. रेल्वेमंत्र्यांनी लोकलला एसी लोकलप्रमाणे स्वयंचलित दरवाजे असतील अशी माहिती जाहीर केली होती. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकलबाबत फडणवीसांनी गुड न्यूज दिली आहे. त्याच तिकीटदरातून लोकल प्रवाशांना मेट्रोसारख्या एसी कोचमधून प्रवास करता येणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे मोठी दुर्घटना घडली होती. उपनगरीय लोकल सेवेला दरवाजे नसल्यामुळं अपघात होत आहेत. अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात. आज दोन क्लास तयार केले आहेत. मेट्रो पूर्णपणे एसी आहे. एसी असल्यामुळं चांगला प्रवास होत आहे. दुसरीकडे लोकल रेल्वे आहे. तिथे गर्दीत लोक प्रवास करतात. दरवाजे नसल्यामुळं अपघात होतात. पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली की मेट्रोसारखे कोचेस हे लोकलला हवेत. जे एसी असतील आणि स्वयंचलित दरवाजे असतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, मेट्रोसारखे कोचेस लावले तरी तिकीटात एक रुपयाचीदेखील वाढ केली जाणार नाही. आम्ही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहोत. लवकरच यासंदर्भात मुंबई येऊन ते घोषणा करतील. लवकरच लोकल रेल्वेचे डब्बे मेट्रोसारखे एसी असतील. रेट्रोफिटिंग नसून नवीन डबे असतील. तसंच, चांगल्या पद्धतीचे डबे असतील. तिकीटाच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.
लोकलचा प्रवास आणखी सुकर व आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पावलं उचलण्यात येत आहेत. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प MUTPअंतर्गंत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC)ने MUTP-4 पुढील पावलं उचलली आहेत. या नवीन टप्प्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हीटी, नवीन लोकल कॉरिडॉर, कवच आणि कम्युनिकेशन बेस्ट ट्रेन कंट्रोल (CBTC) सारख्या प्रगत सुरक्षा प्रणाली आणि 15 डब्यांच्या आणि वातानुकूलित गाड्या वाढवणे अशा महत्त्वकांक्षी योजनांचा समावेश असणार आहे.