Mumbai Local Train Update: दरदिवशी लाखो प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात. लोकलमधील गर्दीचा आकडा हा कायम वाढताना दिसत आहे. वसई-विरार ते कर्ज-कसारा येथून नागरिक कामासाठी मुंबईत येत असतात. त्यामुळं तिथून सुटणाऱ्या लोकल या कायमच गर्दीने तुडुंब भरून येत असतात. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. गर्दीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता तुमची लोकल स्थानकात किती वाजता येणार याची संभाव्य वेळ तुम्हाला कळू शकणार आहे. मध्य रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांतील डब्यांमध्ये लावलेल्या डिजिटल इंडिकेटरवर आता केवळ पुढील स्टेशनचे नावच नाही, तर त्या स्टेशनवर लोकल किती वाजता पोहोचेल, याची वेळदेखील दाखवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेली ही सुविधा आता १०० लोकल गाड्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. लाखो प्रवाशांना या सुविधेचा फायदा होणार आहे.
गर्दीच्या वेळी लोकलमधून प्रवास करताना पुढील स्टेशनचे नाव किंवा वेळ समजणे प्रवाशांसाठी अवघड ठरते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने डिजिटल इंडिकेटरची सुधारित प्रणाली तयार केली आहे. यात पुढील स्टेशन, शेवटचे स्टेशन आणि महत्त्वाची माहिती याशिवाय, स्टेशनवर पोहोचण्याची संभाव्य वेळदेखील दाखवली जाते.
सध्या लोकल स्थानकातील सर्व फलटांवर इंडिकेटर लावण्यात आलेले आहे. मात्र या इंडिकेटर वर कोणती लोकल किती वाजता येणार याची वेळ आणि माहिती दिसते. इतकंच नव्हे तर अनेकदा हे इंडिकेटर बंददेखील असतात. त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळं अनेकदा फलाटावर लोकल कोणती आलीये हे प्रवाशांना कळत नाही. त्यामुळं अनेक प्रवाशांकडून फलाटावरील इंडिकेटर वेळीच दुरुस्त व्हायला हवेत, अशीही मागणी करण्यात येत आहे.