Mumbai Local News Today: मुंबईकरांचा प्रवास सुखाचा आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वेकडून अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्लादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पामुळं लोकलमधील गर्दी कमी होणार आहे. अतिरिक्त मार्गिकेमुळं लोकलसह मालवाहतुकीच्या गाड्यांना फायदा होणार असून यासाठी चुनाभट्टी ते लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंतच्या हार्बर मार्गावर लोकलसाठी एलिव्हेटेड मार्गिका म्हणजे कुर्ला उड्डाणपुलाच्या कामाने वेग घेतला आहे. या पुलामुळं अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होणार असून लोकलची गर्दी कमी होणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा प्रवासही आरामदायी होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्ग 17.50 किमी इतका आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक असलेल्या कुर्ला एलिव्हेटेड मार्गिकेसाठी उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. तसंच, कुर्ला- परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी 10.1 किमी लांबीची नवीन रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे. त्यामुळं कुर्ल्यापुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. 1339 मीटर असा उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. यात सीएसएमटीच्या दिशेकडून 413 मीटर रॅम्प, पनवेलच्या दिशेने 422 मीटर रॅम्प आणि 504 मीटर इतका सपाट भाग आहे. याच उड्डाणपुलांवर हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानक असणार आहे.
पूर्व - पश्चिमेकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी कुर्ला येथील पादचारी पूल फलाट क्रमांक 7 पर्यंत कमी केले जाणार आहेत. त्यांच्या जागी टिळकनगर टोकापर्यंत स्टेशनच्या सर्व एफओबींना जोडणारा स्कायवॉक बांधण्यात येत आहे.याचे काम जून 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक 7-8 तोडले जाणार असून हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक नव्याने बांधलेल्या एलिव्हेटेड फ्लायओव्हर डेकवर वळवली जाणार आहे. त्यामुळं प्रवास वेगवान होणार आहे.