Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार? मुंबई लोकलचे रुप पालटणार, Automatic Door बंद होणार, अन्...

Mumbai Local Train Update: ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार असून सुरुवातीला दोन लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे. 

मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार? मुंबई लोकलचे रुप पालटणार, Automatic Door बंद होणार, अन्...

Mumbai Local Train Update: नव्या वर्षाआधी लोकलचे रुपडं बदलणार आहे. मुंब्रा दुर्घटनेनंतर आता लोकलला स्वयंचलित दरवाजे असतील अशी घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी या नव्या लोकलचा फोटो समोर आला होता. त्यानंतर आता स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल डिसेंबरमध्ये धावणार असण्याची शक्यता आहे. सुरुवातीला दोन लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व लोकल प्रोटोटाइप होणार आहेत. 

मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातात पाच जणांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. रेल्वे अपघातानंतर अधिकाऱ्यांनी आता ऑटोमॅटिक दरवाजे असलेली लोकल धावणार, अशी घोषणा केली होती. त्यानुसार या लोकलचे काम हाती घेण्यात आले होते. 

ऑटोमॅटिक बंद होणाऱ्या दरवाजाच्या दोन लोकलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या लोकल तयार होत असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष सतीश कुमार यांनी सांगितले. प्रोटोटाइपच्या यशस्वी चाचणीनंतर सर्व लोकल अशा पद्धतीच्या करण्यात येतील. यासह २३८ एसी लोकलसाठी लवकरच निविदा प्रक्रिया होऊ शकते, अशीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नवीन वर्षात 12 डब्यांच्या लोकलचे रुपांतर 15 डब्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांचा सुरक्षित प्रवास शक्य होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 15 डब्यांच्या लोकल धावण्यासाठी फलाटांची लांबी मात्र तितकी नाही. त्यामुळं सर्वात आधी फलाटांची रुंदी वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर 15 डब्यांच्या लोकल चालवल्या जाणार आहेत. 

स्वयंचलित दरवाजे कसे असतील?

साध्या लोकलचा नवीन आराखडा तयार करण्याचे काम आयसीएफमध्ये सुरू आहे. दरवाजा उघडताना आणि बंद होताना अलार्मची व्यवस्था असून त्याचे नियंत्रण गार्डकडे असेल. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार सोमवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. ते या डब्याची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर डब्यांची मंजुरी व चाचणीबाबत निर्णय होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर सध्या 1,810 लोकल फेऱ्या धावतात. त्यातील 12 डब्यांच्या लोकल 131 असून 1788 फेऱ्या धावतात. तर 15 डबा लोकल 2 असून त्याच्या 22 फेऱ्या होतात. प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार सर्व लोकल 15 डब्यांच्या करण्यात याव्या अशी प्रवाशांची मागणी आहे. 

1. स्वयंचलित दरवाजे लागण्यामागचे कारण काय आहे?
मुंब्रा येथे 9 जून 2025 रोजी झालेल्या दुर्घटनेत पाच प्रवासी लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर रेल्वेने स्वयंचलित दरवाजे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

2. स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल कोठे तयार होत आहेत?
या लोकल ट्रेनचे काम चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. 

3. स्वयंचलित दरवाज्यांमध्ये कोणत्या खास सुविधा असतील?
नवीन डिझाइनमध्ये लूव्हर असलेले दरवाजे, छतावर बसवलेले व्हेंटिलेशन युनिट्स आणि कोचमधील प्रवाशांच्या हालचालीसाठी व्हेस्टिब्यूल्स असतील. 

Read More