Mumbai Local ticket Whatsapp Booking: मुंबई लोकलचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जातात. वेळेत लोकल पकडायची असते पण लोकलचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची प्रक्रिया यामुळं कधी कधी लोकल सुटते. रेल्वे प्रशासनाने यूटीएसच्या माध्यमातून तिकीट काढण्याची मुभा दिली आहे. मात्र कधीकधी नेटवर्क इश्यू आणि काही तांत्रिक कारणामुळं तिकीट काढण्यात अडचणी येतात. हिच अडचण सोडवण्यासाठी आता रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅप सारख्या चॅट आधारित अॅपद्वारे तिकीट काढण्याची प्रणाली सुरू करण्याचा विचार सुरू आहे.
लोकलची तिकीट प्रणाली आणखी सोयीस्कर होण्यासाठी रेल्वेकडून हा प्रयत्न सुरू करण्यात येणार आहे. याबाबत इच्छुक संस्थांसोबत नुकतीच बैठक झाली. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर निविदा प्रक्रियेबद्दल विचार करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. डिजिटल इंडिया योजनेच्या अंतर्गत भारतीय रेल्वे तिकीट प्रणाली डिजिटल करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. या माध्यमातून प्रवाशांना कॅशलेस आणि जलद तिकीट उपलब्ध करण्यात येत आहेत.
रेल्वेची ही सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना आता रांगेत उभं राहावं लागणार नाही. तिकीट खिडकीजवळ किंवा रेल्वे स्थानकात लावलेल्या क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. हा कोड स्कॅन केल्यानंतर थेट व्हॉट्सअॅप चॅट सुरू होईल. चॅटमध्ये HI मेसेज केल्यानंतर प्रवाशांना तिकीट बुकिंगचे पर्याय दिसतील. आवश्यक माहिती भरल्यानंतर आणि डिजीटल पद्धतीने पैसे भरल्यानंतर व्हॉट्सअॅपवर डिजीटल तिकीट उपलब्ध होणार आहे.
सध्या 25 टक्के प्रवासी डिजिटल माध्यमांद्वारे तिकीट काढत असून त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या डिजिटल तिकीट प्रणालीसोबतच तिकीट प्रणाली सोयीस्कर करण्यासाठी चॅट आधारित तिकीट प्रणाली विकसित करण्यावर रेल्वेचा भर आहे.
रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, तसेच हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर कुर्ला आणि वाशीदरम्यान अप-डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावरही मेगाब्लॉक असेल.