Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

लोकल की मृत्यूचा सापळा? 8 वर्षात इतक्या प्रवाशांचा मृत्यू, हादरवणारी आकडेवारी समोर

Mumbai Local Train News: मुंबई लोकलबाबत एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. पाच वर्षात लोकल ट्रेनमध्ये पडून 777 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी हादरवणारी आहे

लोकल की मृत्यूचा सापळा? 8 वर्षात इतक्या प्रवाशांचा मृत्यू, हादरवणारी आकडेवारी समोर

Mumbai Local Train News: 2021 ते मे 2025पर्यंत लोकल ट्रेनमधून पडून तब्बल 777 जणांचा मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे. तर रूळ ओलांडून 3.151 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सोमवारी दिली. न्यायालयाने पुढील आठवड्यापर्यंत या प्रकरणावरील सुनावणी तहकूब केली आहे. मध्यपश्चिम रेल्वे लोकल ट्रेन अपघातात दरवर्षी अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. शेकडो प्रवाशांचे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वेला आवश्यक उपाययोजना आखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

2021 मध्ये स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींनुसार 'झीरो डेथ'साठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या असून काही उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आल्याचा दावा मध्य रेल्वेने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. मध्य रेल्वेने यावेळी हाती घेतलेले अनेक प्रकल्प आणि ते प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदतही प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यात येणारे अडथळेही न्यायालयासमोर मांडले आहेत.

गेल्या साडेसात वर्षांत म्हणजेच जानेवारी 2018 ते मे2025 या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करताना 8,273 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची कबुली मध्य रेल्वेने दिली. तथापि, हा मृत्यूदर गेल्या काही वर्षांपासून घटत असल्याचा दावाही मध्य रेल्वेने केला.

गेल्या महिन्यात मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या बहुस्तरीय समितीने अहवाल तयार केल्याचे आणि त्या अहवालाची सध्या अंतर्गत समीक्षा सुरू असल्याचेही मध्य रेल्वेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना मध्य रेल्वेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली आहे.

दरम्यान, भूसंपादन समस्या, अतिक्रमण हटविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अतिक्रमण हटविताना येथील रहिवाशांचा सहन करावा लागणारा रोष, या समस्या आहेत. या कारणांमुळे होणारा विलंब म्हणजे रेल्वेची निष्क्रियता आहे, असे समजू नये, असेही मध्य रेल्वेने प्रतिज्ञापत्रात नमूद केले.

Read More