Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुलाब झालेल्या एका 52 वर्षीय व्यक्तीचा शौचाला जाताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा व्यक्ती 18 व्या मजल्यावरुन खाली पडला त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
वडाळ्याच्या जय शिवाजी नगर येथे मातोश्री सदन ही 18 मजल्याची इमारत आहे. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास या इमारतीतील 18 व्या मजल्यावरुन पडून प्रकाश शिंदे यांचा मृत्यू झाला. ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे राहण्यासाठी आले होते. 52 वर्षांच्या व्यक्तीचे पोट खराब झाले होतं. त्यांना अतिसाराचा त्रास होत होता. रविवारी त्यांचा हा त्रास वाढला होता. त्याच्या घरात एकच शौचालय होते. ते शौचालय आधीच वापरात होते. त्यामुळं ते घाईघाईत घराबाहेर गेले आणि शौचास बसण्यासाठी जागा शोधू लागले. इमारतीच्या लिफ्टजवळ असलेल्या उघड्या डक्टजवळ ते शौचास बसले.
शौचास बसले असताना त्यांचा तोल गेला. ते 18व्या मजल्यावरुन थेट तळमजल्यावरील खड्ड्यात पडले. अपघात इतका भीषण होता की ते खाली कोसळल्यानंतर मोठा आवाजदेखील झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांना बोलवण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती हे बेरोजगार असून ते काही काळापासून मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी होता. सध्या तरी पोलीसांनी या घटनेचा अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास करत आहेत.