Mumbai Metro 5 Update: उल्हासनगरला राहणाऱ्या नागरिकांना मुंबईत येण्यासाठी लोकल ट्रेनशिवाय पर्याय नाही. रस्तेमार्गे मुंबईत येणे खूप वेळखाऊ तर आहेच पण त्याचबरोबर पैसेदेखील अधिक मोजावे लागतात. मात्र आला लवकरच उल्हासनगरच्या नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. कारण लवकरच उल्हासनगरमध्ये मेट्रो धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गिकेचा विस्तार आता कल्याणऐवजी उल्हासनगरपर्यंत असणार आहे. खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रोचा विस्तार होणार आहे. 2024-25 वर्षासाठीच्या अर्थसंकल्पानुसार मेट्रो 5चा कल्याण-खडकपाडा आणि खडकपाडा-उल्हासनगर अशा 7.7 किमीच्या विस्तारीत मार्गिकेच्या कामासा सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात यासंबंधीची तरतूद करुन या विस्तीरीकरणाच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात येणार आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका 24.9 किमी लांबीची आणि साडेआठ हजार कोटी खर्चाची मार्गिका आहे. या मार्गिकेवर 17 मेट्रो स्थानके असून ठाण्यापासून मेट्रो सुरू होणार आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार मेट्रो ठाण्याला सुरू होऊन कल्याणपर्यंत धावणार होती. मात्र आता मेट्रोचा विस्तार होऊन थेट खडकपाडा ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो जाणार आहे. लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे-भिवंडी टप्प्याचे काम हाती घेण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्प मार्ग 5 ठाणे - भिवंडी कल्याणसाठी 1,579.99 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा सन 2025-26 साठीचा रू. 40,187.41 कोटींचा अर्थसंकल्प महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी सादर केला. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना अधिकाधिक आणि जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सदर अर्थसंकल्पात रु. 35,151.14 कोटी म्हणजेच एकूण खर्चाच्या सुमारे 87% निधी पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.ही तरतूद मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, नवीन बोगदेमार्ग, सागरी मार्ग, जलस्रोत विकास आणि नागरी पायाभूत सुविधा यांसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातून मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक, समतोल व वेगवान विकासास चालना मिळणार असून, प्रवासाचा वेळ व अंतर कमी होऊन वाहतूक कोंडीस दिलासा मिळणार आहे.