Mumbai Metro Line 5 Thane Bhiwandi: ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो लाइन 5 प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकदा का हा मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास लोकलवरील गर्दीचा ताण हलका होणार आहे. कसा आहे हा मेट्रो मार्ग आणि यात किती स्थानके असणार याची माहिती जाणून घेऊया.
ठाणे-भिवंडी कल्याण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे-भिवंडी कल्याण असा हा मेट्रो लाइन 5 चा मार्ग 24.90 किलोमीटर लांबीचा एलिवेटेड कॉरिडोर आहे. या मार्गिकेवर 15 मेट्रो स्थानके आहेत. मेट्रो मार्गिका 5 चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे. त्यामुळं भिवंडीतून ठाणे किंवा मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांसाठी हा एक सोयीचा व आरामदायी प्रवासाचा मार्ग ठरणार आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ही मेट्रो सेवेत येणार आहे.
सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग -४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग- १२ (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांना हा मेट्रो मार्ग जोडला जाणार आहे. ठाणे ,भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उत्तम सुविधा प्रदान करेल. हा मेट्रो मार्ग सध्याच्या प्रवासाची वेळ 50 % ते 75% पर्यंत कमी करेल. या प्रकल्पासाठी 8416.51 इतका खर्च येण्याची शक्यता आहे. मेट्रोतून दररोज 3 लाख प्रवासी प्रवास करु शकतात. तर, एका मेट्रोत 1756 प्रवाशांची क्षमता आहे.
1. बाळकुम नाका, 2. कशेली, 3. काल्हेर, 4. पूर्णा, 5.अंजुरफाटा, 6. धामणकर नाका, 7. भिवंडी, 8. गोपाळ नगर, 9. टेमघर, 10. रजनोली, 11. गोव गाव, 12 कोन गाव, 13. लाल चौकी, 14. कल्याण स्टेशन, 15. कल्याण एपीएमसी.
मुंबई मेट्रो मार्ग- 5 ठाणे- भिवंडी- कल्याणचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला 1 सप्टेंबर 2019 रोजी देण्यात आले होते. मुंबई मेट्रो मार्ग- 5 ठाणे- भिवंडी- कल्याण ठाणे हा 15 स्थानके असलेला 24.90 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. सदर काम 1 मार्च 2022 रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही 31 मार्च 2025 अशी आहे.