Mumbai Metro Train News: मुंबई मेट्रो 3 लवकरच धावणार आहे. 10 एप्रिलपासून मेट्रो 3 आरे ते वरळीदरम्यान धावणार असून आरे ते वरळी प्रवास आता अगदी 36 मिनिटांत होणार आहे. आरे ते वरळी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना धरावी, सिद्धीविनायक मंदिर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणे सोप्प होणार आहे. कसा असेल मेट्रोचा मार्ग आणि तिकीटाची किंमत जाणून घ्या.
मेट्रो 3 चा पहिला टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू करण्यात आला होता. आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा 12.69 किमी मेट्रोचा पहिला टप्पा होता. या मार्गावर 10 स्थानकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील स्थानके ही 22 ते 28 मीटर जमिनीखाली असून मुंबई विमानतळाजवळील सहार रोड, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहेत. पहिल्या टप्प्यात बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताक्रुझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 1, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2, मरोळ नाका, अंधेरी, सीप्झ आणि आरे कॉलनी या स्थानकांचा समावेश आहे.
बीकेसी ते वरळी हा दुसरा टप्पा 10 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश असणार आहे. आरे कॉलनी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या संपूर्ण मार्गाचे एकेरी भाडे 60 रुपये असणार आहे. अंतरानुसार, तिकीटाची किंमत ठरवण्यात येणार आहे.
आरे ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंतचा प्रवास 34 मिनिटांत पूर्ण होणार आहे. तर, आरे ते वरळी या प्रवासासाठी 36 मिनिटांचा वेळ लागणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास सोप्पा होणार आहे. गर्दीच्या वेळी प्रत्येक 7 मिनिटांला एक मेट्रो धावेल तर इतर वेळी प्रत्येक 10 मिनिटाला एक मेट्रो धावणार आहे.
मेट्रो 3 मार्गिकेला मेट्रो 1,2,6 आणि 9 जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावरील चर्चेगट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससोबत जोडली जाणार आहे. तसंच, मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे.
कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.