Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत दिवसाढवळ्या धावत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग; CCTV व्हिडिओत दिसतंय, तो आला आणि...

Mumbai News : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधातील कायदा कितीही कठोर झाला तरीही या वृत्तीचा नायनाट अद्यापही होत नसल्यानं या घटना मन सुन्न करतच आहेत.   

मुंबईत दिवसाढवळ्या धावत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग; CCTV व्हिडिओत दिसतंय, तो आला आणि...

Mumbai News : महिलांवरील अत्याचारांविरोधात कायदा कठोर करण्याच्या हेतूनं प्रशासनही प्रयत्नशील असलं तरीसुद्धा दुष्कृत्य करणाऱ्यांची वृत्ती मात्र अद्यापही सुधारण्याचं नाव घेत नसून, मन विचलित करणाऱ्या घटना दर दिवशी समोर येत आहेत. अशीच एक घटना नुकतीच मुंबईत घडली, जिथं दिवसाढवळ्या धावत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आला. एका अनोळखी व्यक्तीने शस्त्राचा धाक दाखवत मुंबईत भर दुपारी रिक्षात शिरून 16 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केला. वांद्रे इथं ही घटना घडली असून सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे मागोवा घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

रिक्षा सिग्नलला थांबली आणि... 

रस्त्यावरून वाहतूक सुरू असतानाच सिग्नल लागला आणि रिक्षा सिग्नलला थांबली. तितक्यातच आरोपी रिक्षात शिरला आणि त्यानं चालकाला शस्त्राचा धाक दाखवून रिक्षा चालूच ठेवायला सांगितली. यानंतर त्या इसमानं धावत्या रिक्षात मागे असणाऱ्या आसनावर बसलेल्या महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केला आणि या घटनेनं एकच खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार पीडित तरुणी 16 वर्षांची असून वांद्रे इथंच राहते. दर दिवशी दुपारी ती रिक्षाने महाविद्यालयात जात असून सोमवारीसुद्धा ती नित्यनियमानं महाविद्यालयात जाणयासाठी निघाली. तिनं एस.व्ही. रोड येथील बॉस्टन हॉटेलजवळून रिक्षा पकडली. दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास रिक्षा सायबा हॉटेलजवळ असणाऱ्या सिग्नलवर थांबली. त्यावेळी रस्त्यावर बरीच गर्दी होती, तितक्यातच काळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक इसम अचानक रिक्षात शिरला आणि त्यानं तरुणीचा विनयभंग केला. 

इसमानं रिक्षा थांबताच काढला पळ...

घडल्या प्रकारानं तरुणी आणि रिक्षाचालक दोघंही घाबरले. पुढच्याच सिग्नलवर हा व्यक्ती रिक्षातून उतरून पळून गेला. ज्यानंतर ही तरुणी महाविद्यालयात न जाता तिनं घर गाठलं आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस यंत्रणांनी घटनेचं गांभीर्य पाहता तातडीनं यंत्रणा कामाला लावली आणि सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे मागोवा घेत आरोपीला विक्रोळीतून अटक केली. आतिक शेख  (22) असं या इसमाचं नाव असून, तो वांद्रे इथं फिरण्यासाठी आला होता. उपलब्ध माहितीनुसार हा इसम एका सराफाकडे नोकरीला असून, तो वांद्र्यात रिक्षा शोधत असताना एक तरुणी त्याला रिक्षात एकटी दिसली आणि हीच संधी साधत तो रिक्षात शिरला आणि चालकाला शस्त्राचा धाक दाखवत त्यानं तरुणीचा विनयभंग केला. 

दरम्यान पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीवर भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 74, 78, 79 आणि पोक्सोअंतर्गत कलम 12 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरीही त्यानं संधी साधत केलेल्या या दुष्कृत्यानं आणि विकृत मानसिकतेनं त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read More