Mumbai Homes : मुंबईत हक्काचं घर घेण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या प्रत्येकाच्याच घरासाठीच्या काही अपेक्षा असतात. त्यातच गेल्या काही वर्षांचा किंवा एक दशकभराचा आढावा घेतल्यास शहराच्या रुंदावणाऱ्या कक्षा आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या येथील गगनचुंबी इमारती पाहता घर खरेदीच्या ट्रेंडमध्येसुद्धा बरेच बदल झाले आहेत. सर्व सुविधा असणाऱ्या संकुलांना खरेदीदार प्राधान्य देताना दिसत आहेत. तर, काही खरेरीदारांकडून रेल्वे स्थानक, मंडई अशा ठिकाणांसह आणखी एका साधनाची उपलब्धतासुद्धा प्राधान्यस्थानी ठेवण्यात येत आहे.
काही खरेदीदार कर, या बदलणाऱ्या ट्रेंडनुसार आणि भविष्यातील शहराचं चित्र पाहता नव्या विचारानंच घर खरेदी करत आहेत. जिथं आता चक्क मेट्रोजवळ घर खरेदीला मुंबईकर प्राधान्य आणि पसंती देताना दिसत आहेत. पश्चिम उपनगरांसह आता शहराच्या बहुतांश भागांमध्ये मुंबई मेट्रोचं जाळं अतिशय प्रभावीरित्या कार्यरत आहे. तर काही मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं प्रवास सुकर करणाऱ्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येला शह देणाऱ्या या मेट्रो स्थानकांनजीकच घर घेण्यास मुंबईकर प्राधान्य देत आहेत.
मेट्रो स्थानकानजीकच्या इमारतींतील घरांना, संकुलांना खरेदीदारांकडून मिळणारी पसंती विकासकांच्या पथ्यावर पडत असून, येथील घरांच्या किमती मागील सहा महिन्यांत सरासरी 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. घरांची मागणी आणि उपलब्धतेच्या प्रमाणात दरांमध्ये ही वाढ झाल्याचं लक्षात येत आहे.
शहरातील मेट्रोचं जाळं येत्या तीन वर्षांमध्ये शहरातील 300 किमीपर्यंतचं अंतर व्यापणार असून, त्यामुळं नागरिकांना वेगवान आणि वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेण्याची संधी देणारा प्रवास अनुभवता येणार आहेत. त्यातच जोड म्हणून आता भविष्यातील फायदेशी गुंतवणूक म्हणून मेट्रो स्थानकांनजीकच्या घर खरेदीला मुंबईकर प्राधान्य देताना दिसत आहेत.
फ्री वे, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, मोठमोठ्या अंतरांचे उड्डांणपूल, मेट्रो आणि कोस्टल रोड यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे उपनगरं मुख्य मुंबई शहाराच्या अगदी जवळ आली असून, नागरिकांच्या वेळेची बचत होण्याचा मुद्दा इथं जमेची बाजू ठरत आहे. ज्यामुळं शहरात सध्या घर खरेदीचा हा ट्रेंडसुद्धा बदलल्याचं पाहायला मिळत आहे हेच स्पष्ट होतंय.