Mumbai News Today: मुंबई लोकलमध्येही आता महिला सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्यात मद्याच्या नशेत पोलिसानेच महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरा रोड ते नायगावदरम्यान शनिवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिलांनी प्रसंगावधान राखत या घटनेचा व्हिडिओ काढून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.
शनिवारी दुपारी 2.52 वाजता बोरीवली-वसई लोकल ट्रेनमध्ये घडली होती. महिला प्रवाशांच्या आरोपांनुसार, पोलिस कॉनस्टेबल अमोल किशोर सपकाळ नावाचा कॉन्सटेबल मीरा रोड स्थानकात महिलांच्या डब्यात चढला. आरोपी पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितले की, सपकाल त्याच्या हाताच्या कोपराने महिला प्रवाशांच्या पाठीला जाणूनबूजून स्पर्श करत होता. तर सीटवर बसलेल्या काही महिलांकडून तिकीट मागण्याचे नाटक करत होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, सपकाळ महिलांकडे वाईट नजरेने पाहत होता. इतकंच नव्हे तर, त्याने काही महिलांकडून जबरदस्ती मोबाइल फोनदेखील हिसकावून घेतला होता. त्याच्या या वागण्याचा वैतागून महिलांनी त्याला नायगाव स्थानकात जबरदस्ती उतरवले आणि स्टेशन मास्टरकडे जाऊन तक्रार दाखल केली. या नंतर स्टेशन मास्तरने वसई रेल्वे पोलिसांना सूचना दिली तेव्हा पोलिस लगेचच घटनास्थळी पोहोचली आणि अमोल सपकाळला ताब्यात घेतले आणि मेडिकल तपासणीसाठी पाठवण्यात आले.
अमोक सपकाळ हा मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहे. आता पोलिसच महिलांचा विनयभंग करत असल्यास घराबाहेर पडणाऱ्या महिलांनी विश्वास कोणावर ठेवायचा, असा संतप्त सवाल पीडित महिलेने केला आहे. या प्रकारामुळं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येत आहे.
सोलापुरातील नामवंत खाजगी शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला आहे. 19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंग मध्ये घडला प्रकार. विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने धमकावल्याने विद्यार्थिनीने कोणाकडेही केली नव्हती तक्रार. तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तु दहावीला आहे, आता तु चांगली सापडली आहेस अशा अनेक प्रकारे पीडित विद्यार्थ्यांनीला धमकी देण्यात येत होती. मात्र खाजगी शाळेच्या प्राचार्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांच्या सल्ल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या प्रकाराबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.