Mumbai News : मुंबई शहराचा विकास जितका झपाट्यानं झाला, तितक्याच झपाट्यानं या शहराच्या कक्षाही रुंदावल्या. उद्योग आणि व्यवसायांची पाळंमुळं या शहरात रुजली आणि पाहता पाहता शहराची व्याप्तीसुद्धा वाढली. नवी मुंबई, पश्चिम उपनगर असं करत करत मुंबईच्या सीमा वाढतच गेल्या. इतक्या, की आता तर तिसरी मुंबई उभारण्याचा मानस प्रशासनानं दृष्टीपथात घेत त्यावर कामही सुरू केलं आहे. ही तिसरी मुंबई म्हणजे देशातील एक अतिशय अद्ययावत आणि हायटेक असं शहर असेल आणि ते घडवण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रात भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या आणि याच तंत्रज्ञानाच्या बाबतीत 2050 मध्ये वावरणाऱ्या देशाचा हातभार तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी लागणार आहे.
'व्हिजन मुंबई 3.0' अंतर्गत सर्व सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणारी ही तिसरी मुंबई उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ज्या देशाचा हातभार घेतला आहे तो देश म्हणजे दक्षिण कोरिया. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर उपलब्ध असणारी या देशाविषयीची माहिती पाहता या आशियाई देशाची प्रगती आणि तिथं वापरलं जाणारं तंत्रज्ञान किती अद्ययावत आहे याचा संपूर्ण जगाला अंदाज आहे. अशा या देशाकडून भारतात तिसऱ्या मुंबईच्या रुपात एका स्मार्ट सिटीच्या उभारणीमध्ये दक्षिण कोरियानंही गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळं या विकासकामातील हा एक मोठा टप्पा समजला जात आहे.
तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नुकतीच दक्षिण कोरियाचे उच्चस्तरिय अधिकारी आणि तज्ज्ञांसोबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी तंत्रज्ञान पार्क, औद्योगिक क्लस्टर्स, ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट प्रकल्प, मल्टी परपज टाउनशिप्स, , लॉजिस्टिक्स हब्ज, डेटा सेंटर्स, परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करण्यात झाली.
सध्या तयार करण्यात आलेल्या अटल सेतूच्या क्षेत्रात येणाऱ्या भागामध्ये एमएमआरडीएकडून तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे. नियोजित शहर, राहण्यासह इतर सर्व जीवनावश्यक सुविधा, रस्ते, मेट्रो, जलव्यवस्थापन, हायटेक व्यवसाय उद्योग, फिनटेक झोन, तसेच हरित क्षेत्राचा या शहरात समावेश असेल. त्यामुळं प्रत्यक्षात हे शहर तयार होताना पाहणं आणि अंतिम स्वरुपात ते पूर्णत: तयार झाल्यानंतर पाहणं ही सर्वांसाठीच एक पर्वणी ठरणार आहे.