Mumbai Local Trail Megablock : सुट्टीच्या दिवशी कुठे बाहेर जाणार असाल आणि त्यातही रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी कोणत्या रेल्वे रद्द आणि कोणत्या कालावधीत ब्लॉक आहे हे पाहून घ्या. सध्या सुट्ट्यांचा माहोल पाहता अनेक मंडळी कार्यालयीन सुट्ट्यांच्या दिवशी मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसमवेत भटकंतीसाठी निघतात. मात्र या आठवड्यात ही भटकंती पूर्वनियोजित नसेल तर मात्र रेल्वेनं प्रवास करू पाहणाऱ्या अनेकांचाच खोळंबा होणार आहे आणि यास कारण ठरणार आहे तो म्हणजे रेल्वे मार्गांवर घेण्यात येणारा मेगाब्लॉक.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीपासून तब्बल 35 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान शनिवारी आणि रविवार दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, ब्लॉक कालावधीत पूल क्रमांक 61चा गर्डर
उभारण्याचं काम केलं जाणार आहे. म करण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान 163 उपनगरीय लोकल सेवांसह काही मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात येतील अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.
तिथं पश्चिम रेल्वे ब्लॉकमुळं प्रभावित असतानाच मध्य रेल्वेवरही असंच काहीसं चित्र पाहायला मिळणार आहे. Central Railway च्या विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर तसेच मेगाब्लॉक घेण्यात येईल. शिवाय हार्बर मार्गावरही विविध तांत्रिक आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे या स्थानकांदरम्यान अप मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत आणि डाऊन हार्बर मार्गावर 11.40 वाजल्यापासून ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी , वाशी-बेलापूर-पनवेल दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद राहतील. ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेल दरम्यान 20 मिनिटांच्या फरकानं प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सेवा चालवल्या जातील.
रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक, रद्द झालेल्या काही दैनंदिन लोकल आणि प्रवासात होणारी दिरंगाई या साऱ्या कारणांमुळं मुख्य रेल्वे स्थानकांमध्ये अपेक्षेहून अधिक गर्दी पाहायला मिळू शकते, याचीसुद्धा प्रवाशांनी दखल घ्यावी.
ब्लॉक कालावधीत डाऊन मेल / एक्स्प्रेस अर्थात लांब पल्ल्याच्या गाड्या विद्याविहार स्थानकात डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर, अप मेल-एक्स्प्रेस ठाणे स्थानकात अप जलदमार्गावर वळवल्या जातील ज्या विद्याविहारजवळ पुन्हा पूर्ववत होतील.