Mumbai Best Bus Tickit Price: बेस्ट प्रशासनाने प्रवासी तिकीट दरात वाढ केली आहे. मे महिन्यापासून ही दरवाढ लागू झाली आहे. बेस्टकडून दुप्पट भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.ही भाडेवाढ लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्याचवेळी उत्पन्न मात्र एक कोटी रुपयांनी वाढले आहे. मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी असल्यामुळे बेस्टचे नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
बेस्ट उपक्रमाने बसच्या प्रवासी भाड्यात शुक्रवारपासून वाढ केली. सर्वसाधारण बसचे किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये, तर वातानुकुलित बसचे किमान भाडे 6 रुपयांवरून 12 रुपये करण्यात आले. त्याचबरोबर मुंबईच्या हद्दीबाहेर जाणाऱ्या बस प्रवाशांना वाढलेले बसभाडे आणि त्यावर अधिक 2 रुपये भरावे लागणार आहेत. एकदम दुपटीने भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये पहिल्याच दिवशी नाराजीचे वातावरण होते. मात्र बेस्ट प्रशासनाला भाडेवाढीचा फायदा झाल्याचे पाहायला मिळतेय. प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्न मात्र वाढले आहे. आता मे महिना सरल्यानंतर व सुट्ट्या संपल्यानंतरही बेस्टकडे प्रवासी पाठ फिरवतात की बेस्टलाच पसंती देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
शेअर टॅक्सीला प्रोत्साहन देण्यासाठीच हे भाडे वाढवण्यात आल्याचाही आरोप प्रवासी करीत आहेत. समाजमाध्यमांवरही हा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी जिथे शेअर टॅक्सी १५ रुपये आकारते, तिथे बेस्टचे भाडे १२ रुपये झाले आहे. मात्र, आतापर्यंत बससाठी थांबणारे प्रवासी यापुढे शेअर टॅक्सीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.
अशी असेल भाडेवाढ
५ किमी अंतरासाठी ५ रुपयांवरुन १० रुपये
१० किमी अंतरासाठी १० रुपयांवरुन १५ रुपये
१५ किमी अंतरासाठी १५ रुपयांवरुन २० रुपये
२० किमी अंतरासाठी २० रुपयांवरुन ३० रुपये
वातानुकूलित बस
५ किमी अंतरासाठी ६ रुपयांवरुन १२ रुपये
१० किमी अंतरासाठी १३ रुपयांवरुन २० रुपये
१५ किमी अंतरासाठी १९ रुपयांवरुन ३० रुपये
२० किमी अंतरासाठी २५ रुपयांवरुन ३५ रुपये
मासिक बस पास
5 किमी अंतरासाठी 450 रुपयांवरुन 800 रुपये
10 किमी अंतरासाठी 1000 रुपयांवरुन 1250 रुपये
15 किमी अंतरासाठी 1650 रुपयांवरुन 1700 रुपये
20 किमी अंतरासाठी 2200 रुपयांवरुन 2600 रुपये
मासिक बस पास एसी
5 किमी अंतरासाठी 600 रुपयांवरुन 1100 रुपये
10 किमी अंतरासाठी 1400 रुपयांवरुन 1700 रुपये
15 किमी अंतरासाठी 2100 रुपयांवरुन 2300 रुपये
20 किमी अंतरासाठी 2700 रुपयांवरुन 3500 रुपये