Mumbai Local Train News: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकल फारच चर्चेत आहे. कधी महिलांची हाणामारी तर कधी लोकलमध्ये होणारी भांडणे हे सगळं तर नेहमीच कानावर पडत असतात. मात्र अलीकडेच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये सीवूड्स स्टेशनवर एक महिला 15 दिवसांच्या बाळाला सहप्रवाशाकडे देत फरार झाली आहे. हातात सामान आहे बाळाला घेऊन खाली उतरू शकत नाही, असा बहाणा करत या महिलेने तिचे बाळ सहप्रवासी असलेल्या महिलेच्या हातात दिले. सोमवारी दुपारी ही घटना घडली असून पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू केला आहे.
हार्बर मार्गावरील सीवूड रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारी 12च्या सुमारास मुंबईहून पनवलेला जाणारी लोकल आली. त्यावेळी महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या दिव्या नायडू व भूमिका माने यांच्याकडे एका महिलेने मदत मागितली. हातात सामान असल्यामुळं बाळाला घेऊन उतरू शकत नाही. त्यामुळं बाळाला घ्या, असं तिने सांगितले. दिव्या नायडू आणि भूमिका माने यांनी बाळाला घेतले.
दोघीही बाळाला घेऊन खाली उतरले. मात्र ती महिला रेल्वेतून न उतरता पुढे निघून गेली. ट्रेन पुढे जात असताना त्यांच्याकडे पाहत राहिली. ती परत बाळाला घ्यायला येईल या आशेने दोघीही स्थानकात कितीतरीवेळ वाट पाहत उभ्या राहिल्या होत्या. बराचवेळ ती आली नाही तेव्हा दोघींनी रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. रेल्वे पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतलं असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ साधारणपणे 15 दिवसांचे असल्याचे सांगितले जातंय. तर महिलेचे वय 30-35च्या घरातील आहे. रुग्णालयातून बाळाला सीडब्ल्यूसीमार्फत बालकाश्रमात ठेवण्यात येणार आहे.
तक्रारीच्या आधारे, बाळाला सोडून दिल्याबद्दल अज्ञात महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंद्रे यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली आणि सांगितले की महिलेची ओळख पटविण्यासाठी आणि शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.