Mumbai OLA Uber Strike: मुंबई, पुणे आणि नागपूर येथील ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांच्या चालकांचा सुरू असलेला संप आणखी तीव्र झालाय. या सेवा पुरवणाऱ्या टॅक्सी चालकांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर चालकांनी धरणे आंदोलनाची योजना आखली आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या संपामुळे मुंबई महानगर प्रदेश, पुणे आणि नागपूर येथील टॅक्सी सेवा खंडित झाल्या असून, विशेषतः विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना वाहतूक व्यवस्थेची उपलब्धता तपासून पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला दिलाय. महत्वाच्या कामांसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला याचा सामना करावा लागला.
गेली अनेक वर्षे कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी उबर टॅक्सी बूक केली. पण बराच वेळ झाला टॅक्सीचालक बुकींग केलेल्या ठिकाणी येत नव्हता. यानंतर संबंधित टॅक्सी चालक उलट्या दिशेने जाताना अॅपवर दिसला. आधी 4-5 मिनिटे झाली नंतर 11 मिनिटे झाली तरी उबर चालक येत नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने टॅक्सी चालकाला फोन केला पण तो त्याने उचलला गेला नाही. 'तुम्ही येणार आहात की नाही?' असा मेसेज त्यांनी टॅक्सी चालकाला केला. यावर त्याने 'मी येणार नाही' असे उत्तर दिले. 'जर येणार नसाल तर राईड कॅन्सल करा तर मला दुसरी राईड बूक करता येईल', असा मेसेज कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने केला. यानंतर कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने दुसरी उबर बुक केली. पण तिथेही तसाच अनुभव आला. सुरुवातील चालकाने काही उत्तर दिले नाही. 'तुम्ही येताय का?' या प्रश्नाला उबर चालकाने 'कार इश्यू' असे एका शब्दात उत्तर दिले. 'कृपया राईड रद्द करा' असे सांगितल्यावर कारचालकाकडून 'पर्याय नाही' असे उत्तर दिले. यामुळे कॉर्पोरेट कर्मचाऱ्यास मनस्तापाला सामोरे जावे लागले.
बुधवारी सुमारे 70% ॲप-आधारित टॅक्सी रस्त्यावरून गायब होत्या, त्यामुळे फक्त मर्यादित वाहने बुकिंगसाठी उपलब्ध होती. "चालक शुक्रवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करून आपला निषेध तीव्र करतील. मंगळवारी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारशी कोणतीही चर्चा झालेली नाही," असे महाराष्ट्र गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डॉ. के. एन. क्षीरसागर यांनी सांगितले.
पारंपरिक काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणे ॲप-आधारित टॅक्सींचे भाडे नियंत्रित करणे. बाइक टॅक्सींवर पूर्णपणे बंदी घालणे. काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षा परवान्यांच्या संख्येवर मर्यादा घालणे. ॲप-आधारित चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करणे. तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र गिग कामगार कायदा लागू करणे, अशा मागण्या संपकऱ्यांनी केल्या आहेत.
संपात सहभागी चालक इतर चालकांना सामील होण्यासाठी दबाव टाकत आहेत. चांदिवली नागरिक कल्याण संघटनेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये संप करणारे चालक संपादरम्यान टॅक्सी चालवणाऱ्या एका सहकाऱ्याला शिवीगाळ करताना दिसत आहेत. काही नागरी गटांनी यासंदर्भातील माहिती दिली.
शुक्रवारी हे आंदोलन मध्य मुंबईत आझाद मैदानावर पोहोचल्याने प्रवाशांना आणखी अडचणींचा सामना करावा लागला. संपामुळे टॅक्सी सेवांवर मोठा परिणाम झाला असून विशेषतः विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय होत आहे. सरकार आणि चालकांमधील चर्चा लवकर न झाल्यास हा गोंधळ आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.