Heavy rain in Mumbai: मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही झालीय. उपनगरीय रेल्वे तसेच मेट्रो रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मुंबईत 24 तासांत म्हणजेच सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 95 मिमी पाऊस पडल्याची महिती समोर येतेय. 1 जूनपासून मुसळधार पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झालाय तर 65 जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये 58 आणि 75 मिमी पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नंतर आयएमडीने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आणि सोमवारी रायगडसाठी 'रेड' अलर्ट जारी केला. दुपारी 3.31 वाजता 4.21 मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता होती, त्यानंतर मंगळवारी पहाटे 3.31 वाजता 3.44 मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता होती. रात्री 9.41 वाजता 1.86 मीटर उंचीची कमी भरती येईल. तर मंगळवारी सकाळी 9.10 वाजता 1.33 मीटर उंचीची कमी भरती येण्याचा अंदाज आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा सोमवारी उशिरापर्यंत धावल्या. सकाळच्या गर्दीच्या वेळी 20 ते 30 मिनिटे उशिराने रेल्वे सेवा सुरू झाली.
आझाद नगर स्थानकावर प्लास्टिकची चादरी ओव्हरहेड वायरवर पडल्याने दुपारी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावरील मुंबई मेट्रो सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. सेवा आता सामान्यपणे सुरू आहेत. जोरदार वाऱ्यामुळे, जवळच्या बांधकामाच्या जागेवरून एक प्लास्टिकची शीट आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळील ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईनवर उडून रेल्वे सेवा विस्कळीत झाली," असे मुंबई मेट्रो वनने X वर सांगितले.
सोमवारी मुंबईतील हवामान परिस्थितीमुळे इंडिगो एअरलाइन्सने प्रवास अॅडव्हायजरी जारी केली. X वरील एका पोस्टमध्ये इंडिगोने म्हटलंय की, 'मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि शहराच्या अनेक भागात रस्त्यांची स्थिती मंदावलीय. विमानतळाकडे जाणाऱ्या काही मार्गांवर पाणी साचले आहे आणि दृश्यमानता कमी आहे'इंडिगोने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी अतिरिक्त वेळ देण्यास आणि अॅप किंवा वेबसाइटवर विमानाची स्थिती तपासण्यास सांगितले.स्पाइसजेट एअरलाइनकडूनही अॅडव्हायजरी करण्यात आलीय.
हवामान खात्याने सोमवारी दुपारी रायगडमध्ये रेड अलर्ट जारी केला. ज्यामध्ये रायगडमधील दुर्गम ठिकाणी आणि पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात पुढील 16 तासांत अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.