Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

रेशनिंगचा सर्वात मोठा घोटाळा, धान्यासाठी मृत माणसांचे अंगठे; 'झी २४ तास'चा पंचनामा!

Mumbai rationing scam: झी 24 तासच्या एसआयटी टीमनं रेशनिंग यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराच्या भुतांचा पर्दाफाश केलाय. 

रेशनिंगचा सर्वात मोठा घोटाळा, धान्यासाठी मृत माणसांचे अंगठे; 'झी २४ तास'चा पंचनामा!

गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई: स्वस्त धान्य दुकानं ही गरिबांसाठी आधार आहेत. रेशनिंग यंत्रणा अधिक पारदर्शक व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या. पण काहीही केलं तरी रेशनिंग यंत्रणेतला भ्रष्टाचार संपता संपत नाहीये. रेशनिंग दुकानातून मरण पावलेल्या लोकांच्या नावे रेशनिंग उकळलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. झी 24 तासच्या एसआयटी टीमनं रेशनिंग यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराच्या भुतांचा पर्दाफाश केलाय. 

भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक व्यवहारासाठी सरकारनं अनेक योजना सुरु केल्या. रेशनिंगचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं पॉश यंत्रणा आणून रेशनिंगची यंत्रणा पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न भ्रष्टाचाराच्या भुतांनी हाणून पाडलाय. राज्यातल्या शेकडो रेशनिंग दुकानांमधून भुतं रेशनिंग नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आम्ही भुतांबाबत म्हणजे त्या भुतांबाबत बोलत नाही आम्ही बोलतोय मरण पावलेल्या माणसांच्या नावे रेशनिंग उकळणा-या भ्रष्टाचारी माणसांबाबत.... चक्क मृत माणसांच्या नावे हजारो किलो धान्याचा अपहार केला जात असल्याची माहिती झी 24 तासच्या हाती लागलीये. मृत माणसाच्या नावे रेशनिंग कसं काढलं जातं याचा शोध घेण्यासाठी झी 24 तासच्या एसआयटीची टीम मुंबईतल्या मानखुर्दच्या पीएमजी कॉलनीतल्या बारा नंबरच्या बिल्डिंगमध्ये. तिथं राहणारे धनाजी बाबासाहेब कोडग यांचा 26 जानेवारी 2020 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला रेशनिंगच्या धान्याचा एक कणही मिळालेला नाही, असा दावा दिनेश यांनी केलाय. 

रेशनिंग दुकानदाराच्या मते धनाजी कोडग हे जीवंत असून महिन्याच्या महिन्याला ते रेशनिंगचं 20 किलो धान्य घेऊन जातात. आणि हो मरण पावलेले धनाजी कोडग न चुकता पॉस मशिनवर अंगठाही देतात बरं का?... कोडग कुटुंबीय जेव्हा दुकानदाराला विचारतात तेव्हा तुमचं धान्य बंद झाल्याचं सांगून रेशनिंग दुकानदार त्यांना माघारी पाठवतो...

धनाजी कोडग यांचा मृत्यू झाला, मग कोडग कुटुंबाचं धान्य जातं कुठं?.मरण पावलेले धनाजी कोडग पॉस मशीनवर अंगठा देण्यासाठी कसे जातात असा प्रश्न कुणालाही पडेल. साहजिकच याचं उत्तर आहे तळे राखी तो पाणी चाखी.रेशनिंग दुकानदार धनाजींच्या नावाचं रेशनिंग स्वतःच हडप करतोय हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.

गरीबांच्या हक्काच्या धान्यावर कुणालाही डल्ला मारता येऊ नये यासाठी पॉस यंत्रणा आणली... पण या यंत्रणेलाही पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराची भुतं पुरून उरलीयेत.... ही भुतं गरीबांच्या वाट्याचं रेशनची पळवापळवी करत असल्याचं आणखी नमुने आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

रेशनिंग ढापणा-या भुतांचा शोध घेत एसआयटीची टीम पोहचली मुंबईतल्या मानखुर्दच्या जयहिंदनगरमधील सरस्वती चाळीत...रुम नंबर 744 मध्ये आम्ही पोहचलो... शैला जाधव यांचा मृत्यू 2016मध्ये झालाय. शैला जाधवांच्या मृत्यूला जवळपास 9 वर्ष उलटून गेलीयेत. पण पुरवठाविभागाच्या लेखी शैला जाधव जिवंत आहेत. रेकॉर्डनुसार शैला जाधव दर महिन्याला 35 किलो धान्य घरी घेऊन जातायेत. आता शैला जाधव या 35 किलोचं धान्य एकट्या कसं नेत असतील हे सगळ्यांना पडलेलं कोडं आहे. धक्कादायक बाब म्हणजे शैला जाधव यांचं कुटुंब हे घर सोडून गेलेली अनेक वर्ष झालीयेत. ते नवी मुंबईतल्या खारखर परिसरात राहत असल्याची माहिती आहे. पण रेशनिंगच्या रेकॉर्डनुसार हे कुटुंब मानखुर्दमध्येच वास्तव्याला आहे आणि रेशनिंगही नेतंय.

आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की गोरगरिबांच्या हक्काचं धान्य रेशनिंग दुकानदारच गायब करतात हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे...भ्रष्टाचारासाठी अशी किती भुतं पुरवठा विभागानं उभी केलीयेत याचा शोध झी 24 तासच्या एसआयटीनं घ्यायचं ठरवलं... आम्ही अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वडाळा ई परिमंडळ विभागात माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला.तिथून माहिती मिळण्यास थोडा विलंब झाला म्हणून आम्ही मंत्रालयातल्या अन्न व नागरी पुरवठा विभागात माहितीच्या अधिकाराचा अर्ज केला. त्यातून जी माहिती मिळाली ती माहिती धक्कादायक होती.जगाचा निरोप घेतलेल्या अनेक लोकांच्या नावे रेशनिंग लाटलं जात असल्याची धक्कादायक माहिती कागदपत्रांसह झी 24 तासला मिळाली.

या मृतांच्या नावे लाटलं जातं रेशनिंग

धनाजी कोडग 
शैला जाधव 
राव विजय सपकाळ 
राबिया बानो सिद्दीकी शेख 
मुद्दामा इराप्पा
बाळू काशीराम पवार
जयशंकर शुक्ला
दत्तू पांडू यादव
गुलाबचंद कुशवाह

ही यादी फक्त मुंबईतल्या एका दुकानांत नोंद असलेल्या मरण पावलेल्या लाभार्थींची आहे. मुंबईत एकूण 4 हजार 223 रेशनिंग दुकानं आहेत. या दुकानांमध्ये किती भ्रष्टाचाराची भुतं दरमहिन्याला रेशनिंग घेत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. झी 24 तासला पुरवठा विभागातल्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याला 5 कोटीचं धान्य भ्रष्टाचाराची भुतं गायब करुन नेत असल्याचं सांगण्यात येतंय.

भ्रष्टाचाराच्या या भुतांची कल्पना पुरवठा विभागाला नाही असं नाही. पुरवठा विभागातल्या बहुतांश अधिका-याला भ्रष्टाचाराच्या भुतांची माहिती आहे. पण दर महिन्याला बाबू लोकांचे हात ओले करण्याची एक यंत्रणाच अस्तित्वात आहे. त्यामुळं भुतांच्या जोरावर सगळ्यांचीच चांदी होते.

भ्रष्टाचाराची ही भुतं सगळ्यांनाच आवडतात. कारण त्याचा मलिदा सगळ्यांना मिळतो.गोरगरिबांच्या ताटातलं हक्काचं धान्य चोरुन दिवाळी साजरी करणा-यांना गोरगरिबांचे शिव्याशाप मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारला आम्ही या भ्रष्टाचाराच्या भुतांची माहिती देतोय. आता पुरवठा विभाग या भ्रष्टाचारी भुतांना पळवून लावण्यासाठी काही करतो का याकडं गोरगरीबांचे डोळे लागलेत.

Read More