Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईकरांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय; 29 टर्मिनल अन् 10 मार्गांवर सुरू होणार वॉटर मेट्रो

Water Metro In Mumbai: मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. 

मुंबईकरांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय; 29 टर्मिनल अन् 10 मार्गांवर सुरू होणार वॉटर मेट्रो

Water Metro In Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीमुळं अनेकदा तासनतास अडकून पडावे लागते. मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी प्रशासनाकडून अनेक पर्याय राबवण्यात येतात. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. वॉटर मेट्रोचा आराखडा तीन महिन्यांत सादर करावा, अशा सूचना मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी येथे दिल्या आहेत. 

मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पाहणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लि. कंपनीस देण्यात आले होते. त्याचे सादरीकरण सोमवारी करण्यात आले. मुंबईमध्ये जल वाहतुकीसाठी मोठ्या संधी आहेत. विशेषत: बांद्रा, वरळी, वर्सोवा, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जल वाहतुकीच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. जास्तीत जास्त प्रवासी असणाऱ्या आणि फायद्याच्या मार्गांची निवड करण्यात यावी. वॉटर मेट्रोच्या तिकीटांचे दर ठरविताना ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील असे पहावे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक चांगला पर्याय ठरणार आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, नितेश राणे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ व गतिमान व्हावे यासाठी मुंबईत वॉटर मेट्रो ही संकल्पना नुकतीच मांडण्यात आली होती. यानुसार, मुंबईत वॉटर मेट्रो सुरू करण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक पार पडली. दरम्यान, कोची मेट्रो रेलच्या सहकार्याने मुंबईत वॉटर मेट्रो सुरु करण्याच्या दृष्टीने सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणावर सकारात्मक चर्चा करून वॉटर मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, कोची मेट्रो रेल चे अधिकारी यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण 29 टर्मिनल उभारण्यात येणार असून दहा मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा उभारणे, बोट खरेदी, इतर सुविधा यांचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. प्रकल्पासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. 

Read More