Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

2 बाटल्या बाजूबाजूला ठेवल्या, रक्ताची उलटी अन् मृत्यू... 59 वर्षीय मुंबईकराबरोबर नेमकं घडलं काय?

Mumbai Tragedy: हा सारा प्रकार मुंबईमधील लोअर परळ भागात घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

2 बाटल्या बाजूबाजूला ठेवल्या, रक्ताची उलटी अन् मृत्यू... 59 वर्षीय मुंबईकराबरोबर नेमकं घडलं काय?

Mumbai Tragedy: एखाद्या लहान मुलाने चुकून औषधाऐवजी एखाद्या घातक द्रव्याचे सेवन केल्याच्या बातम्या तुम्ही यापूर्वी ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र मुंबईमध्ये एका छोट्याश्या चुकीमुळे एका 59 व्यक्तीने प्राण गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सारा प्रकार लोअर परळमधील दीपक सिनेमासमोरील चाळीमध्ये घडला आहे. या प्रकरणातील मयत व्यक्तीचं नाव सबाजित धोबी असं आहे.

दोन्ही बाटल्या बाजू-बाजूलाच ठेवल्या

मिळालेल्या माहितीनुसार, खोकल्याचे औषध समजून कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी वापरलं जाणारं लिक्विड प्यायल्याने लाँड्रीचालक असलेल्या सबाजित यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामध्ये एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ येथील दीपक सिनेमासमोरील चाळीत सबाजित एकटेच राहत होते. तेथेच त्यांचा लाँड्रीचा व्यवसाय होता. काही दिवसांपूर्वी सबाजित यांना खोकला झाल्याने त्यांनी पालिका रुग्णालयातून खोकल्याचे औषध आणले होते. तसेच या औषधासारख्या एका बाटलीतच त्यांनी कपड्यांवरील डाग हटविण्यासाठी आणलेले लिक्विडही ठेवले होते. या दोन्ही बाटल्या त्यांनी बाजूबाजूला ठेवलेल्या.

काहीच त्रास न झाल्याने केलं दुर्लक्ष अन्...

बुधवारी रात्री कामाच्या ओघात जास्त त्रास होत असल्याने त्यांनी खोकल्याच्या औषधाच्या बाटलीऐवजी चुकून कपडे स्वच्छ करण्याच्या लिक्विडची बाटली घेतली आणि त्यामधील लिक्विड ते प्यायले. काही वेळाने चुकून लिक्विड प्यायल्याची जाणीव होताच त्यांनी ती बॉटल फेकून दिली. मात्र त्यावेळी त्यांना लगेच प्रकृतीसंदर्भातील काहीच त्रास न झाल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नाष्टा करताना सबाजित यांना अचानक रक्ताची उलटी झाली.

रुग्णालयात नेत असताना दिली कबुली

शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ केईएम रुग्णालयाच्या नेलं. रुग्णालयाकडे घेऊन जात असताना प्रवासात सबाजित यांनी कबुली देताना चुकून आपण काल कपडे स्वच्छ करण्याचं लिक्विड प्यायल्याचे सांगितले. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान संध्याकाळी सबाजित यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.

ती बाटली सापडलीच नाही

सबाजित यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला? याच्या तपासणीसाठी काही नमुने 'फॉरेन्सिक'साठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिसांना ज्या लिक्विडमुळे सबाजित यांचा मृत्यू झाला ते लिक्वीड असलेली बाटलीदेखील अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिस उपनिरीक्षक रफिक शेख तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये सबाजित यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांबरोबरच आजूबाजूच्यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे.

Read More