E-Samarth Portal: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिप किंवा नोकरी शोधण हे कठीण काम असतं. पण आता याची काळजी करण्याची गरज नाही. कारण मुंबई विद्यापीठाअंतर्गत तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात आलाय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांची नोकरी योग्यता आणि करिअर सजगता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई विद्यापीठाच्या ई-समर्थ पोर्टलवर ‘प्लेसमेंट आणि ट्रेनिंग’ हे नवीन मॉड्यूल सुरू करण्यात आले आहे. ऑन-द-जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप आणि औद्योगिक संलग्नता यांना उच्च शिक्षणाशी जोडण्याच्या विद्यापीठाच्या व्यापक दृष्टिकोनातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये नोंदणीकृत असलेले विद्यार्थी आता या पोर्टलद्वारे इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी सहजपणे शोधू शकतील. तसेच सार्वजनिक, खासगी, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्था व औद्योगिक आस्थापना विद्यापीठातील होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी करून त्यांच्या आस्थापनांना लागणारे मनुष्यबळाची गरज नोंदवू शकतील. मुंबई विद्यापीठाने हे नव्याने सुरु केलेले प्रारुप विद्यार्थ्यांसाठी आणि संभाव्य नियोक्त्यांनासाठी एक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम व्यासपीठ म्हणून उपलब्ध होणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या करीअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल (सीटीपीसी) ने या मॉड्यूलसाठी पुढाकार घेतला आहे. विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, संचालक, प्लेसमेंट समन्वयक आणि उद्योग क्षेत्राशी वेळोवेळी समन्वय साधून या प्रारूपाची प्रभावी अंमलबजावणीसाठी सीटीपीसी प्रयत्नशील राहणार आहे. मुंबई विद्यापीठामार्फत गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ मिळवण्यास इच्छुक असलेल्या संस्था या पोर्टलवर नोंदणी करून आपल्या गरजा नोंदवून शैक्षणिक-औद्योगिक सहयोगाच्या व्यासपीठाचा भाग होऊ शकतील. इसमर्थ प्रणालीच्या https://mu.samarth.ac.in/index.php/training/company-profile-requests/register या पोर्टलवर नोंदणी करता येईल.
मुंबई विद्यापीठ नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण आणि स्पर्धात्मक विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांतील गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवत असून विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी आज सार्वजनिक व खाजगी, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देत आहेत. हे नवीन मॉड्यूल विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचे प्रत्यक्ष क्षेत्रात रूपांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच हे मॉड्यूल केवळ प्लेसमेंटसाठीचे साधन नसून, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील दुवा मजबूत करण्याचे साधन असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि उद्योगांना भारतातील अत्यंत सशक्त व बुद्धिमान प्रतिभा लाभावी हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या 100 वर्षाहून अधिक जुन्या आणि प्रतिष्ठित मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीमधील (आधीचे अर्थशास्त्र विभाग) डॉ. एस.ए. दवे सेंटर फॉर रिसर्च अँड टीचिंग इन फायनान्सच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना हवामान बदल, हवामान वित्त (क्लायमेट फायनान्स) आणि शाश्वत विकासाचे धडे गिरवता येतील. या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी नुकताच बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट (BIRD), लखनऊसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट संस्थेमार्फत हवामान वित्ताच्या विशिष्ट क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यार्थ्यांना लखनऊ येथील 'एक्सपेरिअन्शियल क्लायमेट चेंज लॅब'मध्ये शिकण्याचा लाभ मिळेल. तसेच, या विद्यार्थ्यांना बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, लखनऊ येथे इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून धोरणात्मक संवाद घडवून आणण्यासाठी या क्षेत्रातील प्रगत अभ्यास, संशोधन, परिसंवाद आणि परिषदांच्या स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.