Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Mumbai University:विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांना होणार दंड

Mumbai University:  दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना दंड लावण्यात येणार आहे. 

Mumbai University:विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांना होणार दंड

Mumbai University: मुंबई विद्यापीठाने अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करायच्या सूचना दिल्या आहेत. असे न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. काही महाविद्यालये वेळेत प्रवेश प्रक्रिया करीत नाहीत. तसेच विद्यापीठाला विहित मुदतीत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज सादर करीत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्याची विद्यापीठात नोंदणी होत नाही किंवा नोंदणी होते पण पुढील प्रक्रिया केली नसल्याने विद्यार्थ्याच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ( Hall Ticket) तयार होत नाहीत. प्रक्रियेत अडचणी येत असल्याने निकाल जाहीर करत असताना हे निकाल राखीव ठेवावे लागतात.

तसेच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. असे होऊ नये म्हणून विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सर्व विद्याशाखेच्या प्रवेशाच्या अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत. दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना दंड लावण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाने यासंदर्भातील परिपत्रक जाहीर केले आहे. 

प्रवेशाचे वेळापत्रक : 

शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून प्रवेश देण्याची आणि संबधित एमकेसीएल / ई-समर्थ या प्रणालीमध्ये नोंद करण्याची शेवटची तारीख पुढे देण्यात आली आहे. पुढे देण्यात आलेल्या तारखेनंतर प्रवेश देता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमात म्हणजेच  कला, वाणिज्य, विज्ञान शाखानिहाय नियमित व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्ष ( १२ वी निकालानंतर ) 31 ऑगस्ट पर्यंत, द्वितीय वर्ष 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत, तृतीय वर्षासाठी 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजेच एमए, एमकॉम, एमएसस्सी प्रथम वर्ष सत्र 1 आणि 2 साठी 30 सप्टेंबरपर्यंत, द्वितीय वर्ष सत्र 3 आणि 4 साठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र (Architecture), विधी, शिक्षणशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्ष (सीईटी सेलच्या प्रवेश प्रक्रियेनंतर ), द्वितीय वर्ष 30 सप्टेंबर पर्यंत, तृतीय वर्ष 30 सप्टेंबरपर्यंत, चौथे आणि पाचवे वर्ष 30 सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. 

अंतिम तारखेनंतर दंड

महाविद्यालयांनी प्रत्येक दिवसाची प्रवेश प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण करून एमकेसीएल / ई-समर्थ या प्रणालीमध्ये नोंदवण्यात यावी. या मुदतीनंतर प्रवेश करता येणार नाही. संबधित प्रणालीमध्ये शेवटच्या तारखेपर्यंत नोंदणी केल्यास दंड आकारण्यात येईल. अंतिम तारखेनंतर ३० दिवसापर्यंत  500 रुपये इतका दंड असेल तर 30 दिवसानंतर 5 हजार दंड + प्रती विद्यार्थी, प्रतीदिन 10 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.  यासाठी सर्व प्रवेश प्रक्रिया त्याच शैक्षणिक वर्षात करणे आवश्यक आहे. ही प्रवेश प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत पुढील शैक्षणिक वर्षात केल्या जाणार नाहीत. 

प्रलंबित प्रकरणे 

जर महाविद्यालयांकडून शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 मधील काही प्रलंबित प्रकरणे असल्यास त्या त्या महाविद्यालयांनी व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार दंड भरून दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत विद्यापीठात आणून जमा कराव्यात असे निर्देश विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिले आहेत.

पुनरावलोकन समिती 

यात जर काही अडचणी आल्यास किंवा शंका निवारण करण्यासाठी विद्यापीठाने एका पुनरावलोकन समितीची स्थापना केली आहे. यात कुलसचिव, संचालक (परीक्षा व मूल्यमापन मंडळ ), उपकुलसचिव (परीक्षा व निकाल), उपकुलसचिव ( प्रवेश,नावनोंदणी,पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभाग ) यांची एक समिती स्थापन केली असून यामध्ये येणाऱ्या तक्रारीचे निवारण ही समिती करणार आहे असे प्रवेश, नावनोंदणी,पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागाचे उपकुलसचिव अशोक घुले यांनी सांगितले.

Read More