Mumbai University: पदवीचे शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्वाचे पाऊल टाकले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कौशल्य-आधारित उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनाला अनुसरून, मुंबई विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या कौशल्य प्रशिक्षण मंडळ पश्चिम विभाग यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण कराराच्या अनुषंगाने उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील सहकार्य अधिक बळकट करून विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी कार्यक्रम अंतर्गत (Apprenticeship Embedded Degree Program - AEDP) विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रसंगी कौशल्य प्रशिक्षण मंडळ पश्चिम विभागचे क्षेत्रीय संचालक पी. एन. जुमले आणि सहाय्यक संचालक एन.सी. गांगडे यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्राचार्य अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
हा करार देशातील उच्च शिक्षणाला उद्योग-सुसंगत बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून या ऐतिहासिक सहकार्याद्वारे, पारंपरिक शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये उद्योग-आधारित प्रशिक्षणाचा समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष कार्यानुभव, अद्ययावत कौशल्यविकास आणि सध्याच्या रोजगार बाजारपेठेसाठी आवश्यक असलेली रोजगारक्षमता प्रदान करण्यास सहाय्यभूत होणार आहे. तसेच उच्च शिक्षण अधिक परिणामकारक आणि रोजगाराभिमुख बनविण्यासाठी या कराराचे महत्व अधोरेखित होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
या सहकार्यांतर्गत विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांबरोबरच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा, फिनटेक आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्येही विशेष अभ्यासक्रम व प्रशिक्षणे सुरू केली जाणार असून यामुळे विद्यार्थी भविष्यातील उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज होतील असा आशावादही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 साठी मुंबई विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तायकोंन्दो खेळ प्रकारासाठी शिवम शेट्टी तर बॅडमिंटनसाठी अलिशा खान भारतीय संघात मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत. गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर येथे पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सच्या निवड चाचणीमध्ये शिवम शेट्टी यांनी उकृष्ट कामगिरी करत 63 किलो वजन गटामध्ये भारतीय तायकोंन्दो संघात आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी शिवम शेट्टी यांनी राष्ट्रीय वरिष्ठ गट चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक प्राप्त केले तर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत त्याने गोल्ड मेडल प्राप्त केले होते. के.आय.टी. विद्यापीठ भुवनेश्वर येथे पार पडलेल्या बॅडमिंटन निवड चाचणी मध्ये अलिशा खान या विद्यार्थिनीने अप्रतिम कामगिरी करत महिला दुहेरी भारतीय संघात स्थान निश्चित केले आहे. आलिशा खान हिने युगांडा इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक आणि इराण फजर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कास्यपद प्राप्त केले होते.