Mumbai University Results: मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्र उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र 6 परीक्षेचा निकाल दिनांक 6 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला असून अवघ्या 13 दिवसात हा निकाल विद्यापीठाने जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी एकूण 54,881 एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते, त्यापैकी 53,671 एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 15,445 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 16,521 एवढ्या विद्यार्थ्यांचे निकाल एबीसी आयडी अभावी राखीव ठेवण्यात आले आहेत. या निकालाची उत्तीर्णतेची टक्केवारी 55.47 एवढी आहे. या परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलाय.
विद्यार्थ्यांची एबीसी आयडी किवा अपार आयडी ही अतिशय महत्वाची बाब असून विद्यार्थ्यानी त्यांनी कमावलेले श्रेयांक याचा तपशील डिजिलॉकरवर उपलब्ध करून दिला जात असल्याने त्याना पुढील शिक्षणाच्या अनुषंगाने किवा वैधतेच्या अनुषंगाने आवश्यक असल्याने महत्त्वाचे असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. एबीसी आयडी विद्यार्थ्यांना एकत्रित केलेले श्रेयांक देशभरातील कोणत्याही विद्यापीठात हस्तांतरित व उपयोग करण्याची मुभा देते. विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक तपशील Academic Bank of Credits मध्ये सुरक्षित ठेवला जात असल्याने त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कालावधीत वापरता येते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या युनिक आयडीमुळे दुहेरी नोंदणी, नक्कल किंवा चूकीची नोंद किंवा फसवणूक टाळली जाऊ शकते.
विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील डिजीलॉकर (DigiLocker), नॅशनल एकेडमिक डिपॉझटरी (National Academic Depository) आणि UGC/NTA यांसारख्या शासकीय प्रणालींशी डेटा जोडण्यासाठी एबीसी आयडी आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना एकाधिक प्रवेश व निर्गमन (Multiple Entry-Exit) पर्यायांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे या लवचिकतेचा लाभ घेण्यासाठी एबीसी आयडी असणे अनिवार्य आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक श्रेयांक Academic Bank of Credits प्रणालीमध्ये हस्तांतरित (Transfer) करणे अनिवार्य आहे. 2025 या शैक्षणिक वर्षापासून, ज्या विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी उपलब्ध असतील फक्त अशाच विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल.
जर विद्यार्थ्यांकडे एबीसी आयडी नसेल, तर निकालामध्ये “एबीसी आयडी उपलब्ध नसल्यामुळे राखीव” असे नमूद करण्यात येईल. त्यासाठी, मुंबई विद्यापीठाच्या वतीने सर्व महाविद्यालये व उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना एबीसी आयडी तयार करण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे. उच्च माध्यमिक मंडळाचा नुकताच जाहीर झालेला निकाल हा डिजिलॉकर आणि अपार आयडी यावर अनुषंगाने जाहीर करण्यात आला आहे.
विद्यापीठाने वारंवार विविध परिपत्रके, सूचना आणि महाविद्यालयांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या एबीसी आयडी विद्यापीठाच्या पोर्टल वर अपलोड करायच्या सूचना दिल्या होत्या. मात्र काही महाविद्यालयांनी अद्यापही काही विद्यार्थ्यांच्या एबीसी आयडीचा तपशील विद्यापीठाकडे सादर न केल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
उन्हाळी सत्र 2025 च्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र 6 या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाने सुक्ष्म नियोजन केले होते. परीक्षा संपल्यापासून ते जलदगतीने मूल्यांकन करून सहकार्य केल्याबद्दल या प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी आभार मानले.