Nishikant Dubey on language corntroversy Raj Thackeray Uddhav Thackeray : हिंदी आणि मराठी भाषा, त्रिभाषा सूत्रावरून सत्ताधारी राज्यात बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या असताना आता त्यात खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यानं राज ठाकरे आणि मराठी भाषिकांना डिवचलं. इतक्यावरच न थांबता आता पुन्हा एकदा एका मुलाखतीदरम्यान दुबे यांनी थेट मुंबईचं महाराष्ट्रातील स्थान आणि गुजरातशी असणारं नातं यावर भाष्य करत अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
'तुम्हाला हिंदी राष्ट्रभाषा मानायची नाहीये, तुम्हाला इंग्रजांची इंग्रजी पटतेय, तिचा समावेश त्रिभाषा सूत्रामध्ये आहे. ती इंग्रजी भाषा शिकवण्यास काही त्रास नाही. ब्रिटनची इंग्रजी भाषा भारतात शिकवली जाईल. त्यात काही नाही... पण तरी तुम्ही आंदोलन केलं. पण, हिंदी भाषेच्या नावावर जो डंका वाजवला जातोय. मराठी मराठी करताय, मी सांगतो मुंबई तर गुजरातचा भाग होती. मुंबई महाराष्ट्राचा भाग नव्हती. 1956 जेव्हा भाषेच्या आधारावर विभागणी झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली. खूप चांगली गोष्ट झाली ही. पण आजही मुंबईची स्थिती अशी आहे की फक्त 31 ते 32 टक्के मराठी भाषिक मुंबईत राहतात आणि तितकेच नागरिक हिंदी भाषिक आहेत. 2 टक्के भोजपुरी 12 टक्को गुजराती, 3 टक्के तेलुगु आणि 3 टक्के तमिळ, 2 टक्के राजस्थानी 1 ते 12 टक्के उर्दू भाषिक राहतात', असं दुबे म्हणाले.
महाराष्ट्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत सहभाग आणि योगदान आहे हे कोणीच नाकारत नाही असं म्हणताना महाराष्ट्राकडून जो कर दिला जातो त्यात आमचाही अधिकार आहे हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. यावर 'आमचाही म्हणजे कोणाचा?' असा प्रश्न केला असता त्या प्रश्नाचं उत्तर देत 'संपूर्ण देशाचा....' असं ते म्हणाले.
'देशातील सर्वात मोठं टॅक्स पेयर एसबीआय (SBI) असून त्यांचं मुख्यालय मुंबईत आहेस तो कर महाराष्ट्रात जातो. त्याच तुमचा आणि आमचाही पैसा आहे. एलआयसीची पॉलिसी सर्वांकडे आहे मात्र त्यांचं मुख्यालय मुंबईत आहे त्यांचा कर स्वरुपातील पैसा हा महाराष्ट्राला मिळतोय', असं म्हणत टाटा बिर्ला यांच्या कंपन्यांच्या मुख्यालयाचा उल्लेख करत कर रचनेशी त्याचं समीकरण जोडून यांच्याकडूनही महाराष्ट्राला कर मिळत असल्याचा मुद्दा दुबे यांनी उचलून धरला.
'महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत असणाऱ्या पैशांवर आमचाही अधिकार आहे. तुम्ही सक्षम आहात, या देशाच्या अर्थव्यवस्थेवर तुमचं योगदान मी नाकारत नाही. तुम्हाला जर बिगर मराठी नागरिक योग्य वाटत नसतील तर, तुम्ही हाती दांडा घेऊन एसबीआयच्या चेअरमनसमोर उभे राहा. एलआयसी समोर जा, त्यांना मराठी नाही येत... मारा त्यांना. त्यांची मुख्यालयं जाऊदे बाहेर', असं खुलं आव्हान दिलं. मुंबईतील सिनेसृष्टीत असणाऱ्या अमराठी कलाकारांनाही बाहेर काढा, असं म्हणत मराठीत चित्रपट बनवायचाय तर इथं थांबा नाहीतर त्यांना निघून जायला सांगा असा फुकाचा सल्ला दुबे यांनी दिला.
#WATCH | On his 'Patak Patak ke Maarenge' remark, BJP MP Nishikant Dubey says, "I am saying this again, I stand by my statements. This nation is diverse, and all its people have a strong affection for their region...If Maharashtra is a part of this country, then anyone can be… pic.twitter.com/U0CqZa2Zix
— ANI (@ANI) July 18, 2025
'शेअर बाजार, सेबीचेही मुख्य अधिकारी मराठी नाहीयेत. त्यांनाही राज्याबाहेर काढा. राज आणि उद्धव ठाकरे यांना माझं सांगणं आहे जेव्हाजेव्हा बीएमसीच्या निवडणुका होतात तेव्हा गरिबांना मारलं जातं. 'सर्वांना मातृभाषेवर गर्व असतो. हिंदी बोलतो, हिंदीनं आम्हाला सर्वकाही दिलं आहे. हिंदीवर जेव्हा हल्ला होईल आणि जे हल्ला करतील मग ते राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, ते कोण मोठे साहेब नाहीत... मी पुन्हा सांगतोय मी एक खासदार आहे, मी कायदा हातात घेत नाही. पण, जेव्हा केव्हा ते बाहेर जातील तेव्हा तिथले नागरिक आपटून आपटून मारतील', असं दुबे म्हणाले. आता त्यांना ठाकरे बंधुंकडून नेमकं काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाची बाब असेल.