Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

चांदीची मडकी, सोन्याची माशी... ; प्रेम मिळवण्यासाठी 18 वर्षांच्या तरुणीने 13 तोळं सोनं दिलं अन्...

Mumbai Crime News: प्रेमभंग झालेल्या तरुणींना परत प्रेम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आली आहे. 

चांदीची मडकी, सोन्याची माशी... ; प्रेम मिळवण्यासाठी 18 वर्षांच्या तरुणीने 13 तोळं सोनं दिलं अन्...

Mumbai Crime News: प्रेमभंग झालेल्या तरुणींना प्रेम मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील कुख्यात टोळीतील दोन भामट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मुंबईतील एका तरुणीला 16 लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर या टोळीचा छडा लागला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमभंग तरुण-तरुणींच्या झालेल्या मानसिकतेचा पूरेपूर फायदा घेत त्यांना इन्स्टाग्रामद्वारे जाळ्यात ओढायचे. गमावलेले प्रेम पुन्हा मिळविण्यासाठी उपाय असल्याचे सांगत त्यांच्याकडून पैसे उकळायचे. अशा प्रकारे लुबाडणाऱ्या टोळीच्या कारवाया गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या आहेत.  राजस्थानच्या श्री गंगानगर या पाकिस्तान सीमेवरील शहरातून दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या टोळीने महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणासह अन्य राज्यांतील तरुणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने इंस्टाग्रामवर 'लॉस्ट लव्ह बॅक, खोया हुआ प्यार पाये २४ घंटो मे' अशा आशयाच्या अनेक जाहिराती पसरवल्या होत्या. दक्षिण मुंबईतील प्रेमभंग झालेल्या एका 18 वर्षीय तरुणीने ही जाहिरात पाहून तिला लाइक केले. त्यानंतर समोरून तिला फोन सुरू झाले. मौलवी असल्याचे भासवून एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. 'तुझे प्रेम तुला अवघ्या काही तासात मिळवून देऊ, त्यासाठी काही विधी करावे लागतील. या विधीला सोने, चांदी आणि काही रोख रक्कम लागेल, असे तिला सांगण्यात आले. त्यात चांदीची मडकी, सोन्याची माशी, सोन्याचा दिवा, हात्तातोडी वनस्पती, सोन्याचे खिळे आदींचा समावेश होता. पैसे दिले तर आम्ही या वस्तू आणून विधी करून आणि तुला तुझे प्रेम परत मिळवून देऊ, असा दावा भामट्याने केला होता.

या तरुणीने 1 ऑगस्ट रोजी या व्यक्तीस विधी करण्यासाठी मुंबईत बोलावले. घरातील सुमारे 13 तोळे सोन्याचे दागिने आणि तीन लाख रुपयांची रोकड तिने या व्यक्तींच्या स्वाधीन केली. ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्याकडे एवढे पैसे नव्हते. परंतु ती या भामट्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली होती. तरुणीने स्वतःच्याच घरात चोरी करत ही रक्कम मिळवली. 

गुन्हे शाखा 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मांजरे, पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे, तसेच उतेकर, तळेकर, पाडवी, बोरसे, थिमटे, डेरे, हरड, सय्यद, आव्हाड आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास करून या भामट्यांना अटक केली. दरम्यान, समाजमाध्यमावरील अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

FAQ

1) या टोळीची  (मोडस ऑपरेंडी) काय होती?

टोळीने इन्स्टाग्रामवर "मौलाना इरफान खानजी" नावाचे पेज तयार करून "24 तासांत प्रेम परत मिळवा" अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या. प्रेमभंग झालेल्या तरुण-तरुणींशी मौलवी असल्याचे भासवायचे

2) या टोळीने इतर कोणत्या राज्यांमध्ये फसवणूक केली आहे?

या टोळीने महाराष्ट्र (मुंबई), दिल्ली आणि हरयाणामधील तरुण-तरुणींना लक्ष्य केले आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर अनेक फॉलोअर्स असून, इतर अनेकांना अशाच प्रकारे फसवल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

3) या प्रकरणात पोलिसांनी काय सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे?

पोलिसांनी तरुण-तरुणींना समाजमाध्यमांवरील संशयास्पद जाहिरातींपासून सावध राहण्याचा आणि कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी त्याची खातरजमा करण्याचा सल्ला दिला आहे. 

Read More