Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंब्रा अपघाताचे गूढ अद्याप कायम! खिडकीची दबलेली जाळी, डब्यावरील ओरखडे अन् केवळ पाच...

Mumbra Local Accident News: मुंब्रा अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. आता या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. 

मुंब्रा अपघाताचे गूढ अद्याप कायम! खिडकीची दबलेली जाळी, डब्यावरील ओरखडे अन् केवळ पाच...

Mumbra Local Accident News: कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत या जलद लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 9 प्रवासी हे गंभीर जखमी आहेत. मुंब्रा येथे हा अपघात कसा घडला?  याची चौकशी करण्यात येत आहे. मात्र कित्येक दिवस उलटूनही मुंब्रा अपघाताचे गूढ काही समोर येईना. अपघाताच्या चौकशीत ठोस निष्कर्ष अद्याप हाती आलेला नाही. या प्रकरणी मध्य रेल्वेने नियुक्त केलेल्या उच्च स्तरीय समितीला मिळालेला प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प ठरला असून, मिळालेल्या माहितीतून अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दिवा- मुंब्रा स्थानकादरम्यान 9 जून रोजी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. सीएसएमटीकडे जाणारी एक लोकल आणि कसारा येथे जाणाऱ्या लोकलमध्ये दरवाजावर लटकत असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्यामुळं अपघात घडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती. या अपघातात 13 प्रवासी खाली कोसळले होते. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 9 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंब्रा रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडूनदेखील हेच सांगण्यात येत होते. मुंब्रा अपघात नेमका कसा घडला, याची चौकशी करण्यात येत आहे. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली. या समितीच्या तपासणीत कसारा-सीएसएमटी लोकलमधील एका डब्याच्या बाह्यभागावर ओरखडे आढळले असून, खिडकीवरील बाह्य जाळीही दबलेल्या अवस्थेत होती. ही जाळी नेमकी कशामुळे दबली, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेचे कारण शोधण्यासाठी प्रवाशांकडून माहिती मागवण्यात आली होती; मात्र रेल्वेच्या आवाहनाला केवळ पाच प्रवाशांनी प्रतिसाद दिला. यामध्ये दोन प्रवाशांनी फोनवरून आणि तीन प्रवाशांनी ई-मेलद्वारे प्रतिसाद दिला आहे.

पाचही प्रवाशांनी अपघाताबाबत नवी माहिती दिली नसून लोकल फेऱ्या वाढवाव्यात किंवा गदीं नियंत्रणासाठी उपाय करावेत, अशा स्वरूपाचे सामान्य सूचनाच दिल्या आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की चौकशी अहवाल येत्या आठवड्यात सादर केला जाणार असून त्याआधी आणखी काही पुरावे हाती लागतील, अशी शक्यता कमी आहे. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलिसांना रेल्वेचे मोटरमन, गार्ड यांच्यासह अन्य काहींची चौकशी करायची आहे. मोटरमन, गार्ड यांना चौकशीला बोलवण्यात आले होते. मात्र ते आलेच नाही, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय. जीआरपीने सीसीटिव्ही फुटेज तपासले असून आता रेल्वेकडून तांत्रिक मुद्दे स्पष्ट करण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी अपघातग्रस्त लोकलचे गार्ड, मोटरमन यांची चौकशी जीआरपी करणार आहे. 

Read More