देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला (Marathi Women) कार्यालयासाठी मुलुंड इथल्या शिवसदन सोसायटीमध्ये जागा नाकारण्यात आली. या घटनेवरून सध्या विविध प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळतातय. मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील या प्रकरणात तापले. यामुळे शिवसदन सोसायटीमधील ज्यांनी जागा नाकारली त्या दोन जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. तिकडे मराठी महिलेला घर नाकारण्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता मुस्लिम (Muslim), मागासवर्गीय (Backward Class) तसेच मांसाहारी लोकांनाही घर मुंबईत नाकारली जातात हा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या मुद्द्यावरती भाष्य केलं आहे
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात 'मराठी महिलेला घर नाकारल म्हणून गुजराती लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारवाडी जैन गुजराथी हाउसींग सोसायटी मधे मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून घरे मिळत नाहीत .मुंबईत हे सगळ्यांना माहितीच आहे. मुलूंड मधील घटनेनंतर गुजराथी लोकांना हाकलून लावा अशा कमेंटचा पाऊस न्युज खाली पडला. हेच मराठी लोक जात पाहून शेडुल्ड कास्ट लोकांना घरे नाकारतात. धर्म पाहून मुसलमानांना घर नाकारतात. शेरास सव्वाशेर गुजराथी मारवाडी जैन हे मराठी लोकांना जेव्हा लात घालतो तेव्हा हे किंचाळतात कटू पण सत्य आहे'
मराठी महिलेला घर नाकारल म्हणून गुजराथी लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2023
मारवाडी जैन गुजराथी हाउसींग सोसायटी मधे मराठी लोकांना खालच्या दर्जाचे,मांस खाणारे म्हणून घरे मिळत नाहीत.मुंबईत हे सगळ्यांना माहितीच आहे.
मुलूंड मधील घटनेनंतर गुजराथी लोकांना हाकलून लावा अशा कमेंटचा पाऊस…
रईस शेख यांनीही उपस्थित केला मुद्दा
भिवंडी मधील समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी देखील अशाच पद्धतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. रईस शेख त्यांच्यामध्ये ट्विट मध्ये म्हणतात 'मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात मराठी माणसाला कार्यालयासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आल्याचे प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला अशी वागणूक मिळणे ही राज्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. याच पद्धतीची वागणूक मुस्लिम समाजालाही अनेक ठिकाणी दिली जाते. भाषा, जात, धर्म, पेहराव, खानपानवरून जो भदभाव केला जातो, त्याचा मी जाहीर निषेध करतो. सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की दोषींवर कठोर कारवाई करावी आणि यासंदर्भात कडक कायदा करावा जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल.
जाती आणि धर्मावरून घर नाकारल्याच्या घटना यापूर्वीही उघडकीस आलेल्या आहेत ही प्रकरण हाताळलेले मुंबईतील समाजसेवक अल्ताफ पटेल यांच्या मते मराठी माणसांना मुंबई महाराष्ट्रात घर किंवा जागा नाकारणे हे अत्यंत खेदजनक आहे. पण मुस्लिम समाजाबाबत वारंवार अशा घटना घडताना दिसतात. आज जे मुस्लिम नेते मराठी माणसाला घर नाकारल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत ते मुस्लिम समाजातील व्यक्तींना घर नाकारल्या नंतर शांत का बसतात? हा खरा सवाल आहे.