Mumbai Local Train Update: मुंबई महानगर क्षेत्रात अतिशय महत्त्वाचा असलेल्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाच्या 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 1777 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं आता मुंबई लोकलला अधिक बळ येणार असून प्रवाशांची गैरसोयदेखील टाळणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रामधील पायाभूत वाहतूक व दळणवळण सेवा सुधारण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.ने मांडलेला एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गंत मुंबई लोकल अधिक वेगवान व आरामदायी व्हावी यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. अर्थसंकल्पात MUTP साठी अधिक अर्थसहाय्य दिल्याने आता प्रकल्पाचा वेगही वाढणार आहे.
मागील वर्षीच्या 789 कोटींच्या तुलनेत यंदा हा निधी 125 टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान, राज्य शासनही तितकीच रक्कम त्यासाठी देणार आहे. यामुळे एकूण निधीचा पुरवठा दुप्पट होऊन या क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी वेगाने सुधारेल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील, असा दावा मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनने केला आहे. एमयूटीपी - 1 मध्ये नऊवरून बारा डब्यांच्या उपनगरीय गाड्या सुरू करण्यात यापूर्वीच यश आले आहे. त्यातून बोरिवली-विरार आणि कुर्ला-ठाणे या जादा मार्गिकाही सुरू करण्यात आल्या आहेत.
एमयूटीपी-2 मध्ये सर्व डीसी गाड्यांचे एसीमध्ये परिवर्तन करण्याचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. ठाणे-दिवा दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका सुरू झाली आहे, त्याचप्रमाणे या टप्प्यात सीएसएमटी-कुर्ला मार्गावर पाचवी, सहावी मार्गिका आणि मुंबई सेंट्रल-बोरीवली सहाव्या मार्गिकेचे काम वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. एमयुटीपी-3 मध्ये पनवेल-कर्जत हा प्रकल्प, ऐरोली-कळवा हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या टप्प्यात बोरीवली-विरार, गोरेगाव-बोरीवली हार्बर लाइन, कल्याण-बदलापूर, कल्याण-आसनगावदरम्यान विस्ताराची कामेही नियोजित आहेत.
दरम्यान, मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (टप्पा-2) 100 कोटी, मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (टप्पा-३) 800 कोटी आणि मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3/अ 877 कोटी अशी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण एमयूटीपी प्रकल्पांना गती मिळणार असून महानगरातील कनेक्टिव्हीटी सुधारून प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहे. आर्थिक पाठबळामुळं नवीन कॉरिडॉर, स्टेशन उन्नतीकरण आणि सुधारित रेल्वे पायाभूत सुविधा यांसह महत्त्वपूर्ण एमयुटीपी प्रकल्प वेगाने प्रगती करत आहेत.