मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद काही शमण्याच नाव घेत नाही. नवाब मलिकांनी मध्यरात्री रात्री समीर वानखेडेंचा जुना फोटो ट्विट केला आहे. या ट्विटसोबत नवाब मलिकांनी एक सवाल देखील विचारला आहे.
नवाब मलिक हे सध्या दुबई दौऱ्यावर गेले आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा आहे. तिथे गेल्यावरही समीर वानखेडे यांच्यावरील त्यांचे हल्ले थांबलेले नाहीत. मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे.
वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसत आहे. मात्र त्याबाबत फोड न करता मलिक यांनी फोटोवरूनच सवाल केला आहे. 'कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असे प्रश्नार्थक ट्वीट या फोटोसह मलिक यांनी केले आहे.
कबूल है, कबूल है, कबूल है...
— Nawab Malik नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021
यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0
समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली. यामाध्यमातून त्यांनी सरकारी नोकरी मिळवली, असा दावा देखील नवाब मलिकांनी केला आहे. हा वाद मुंबई हायकोर्टात गेला आहे. तसेच वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नाव मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तिथे मलिक यांनी आपल्याकडील पुरावे सादर केले आहेत.