Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'नाईट लाईफमुळे मुंबईत मद्यसंस्कृती फोफावेल; महिलांवर अत्याचार होतील'

मुंबईत नाईट लाईफ सुरु करणे, हा आदित्य ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

'नाईट लाईफमुळे मुंबईत मद्यसंस्कृती फोफावेल; महिलांवर अत्याचार होतील'

मुंबई: ठाकरे सरकारच्या नाईट लाईफ सुरु करण्याच्या निर्णयामुळे मुंबईत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल, अशी भीती भाजप नेते राज पुरोहित यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी त्यांनी नाईट लाईफ सुरु करण्याच्या निर्णयावर सडकून टीका केली. राज पुरोहित यांनी म्हटले की, नाईट लाईफमुळे मुंबईत दारू पिण्याची संस्कृती फोफावेल. त्यामुळे निर्भया प्रकरणासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल.  ही संस्कृती आपल्या देशासाठी योग्य आहे का, याचा विचार सरकारने करावा, असे राज पुरोहित यांनी सांगितले. 

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार २६ जानेवारीपासून रात्रीच्यावेळीही दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्वावर मॉल्स, पब आणि हॉटेल्स सुरु राहणार आहेत. मुंबईत नाईट लाईफ सुरु करणे, हा आदित्य ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे सामान्य नागरिकांची सोय आणि रोजगार उपलब्ध होतील, असा शिवसेना नेत्यांचा दावा आहे. 

मात्र, भाजपकडून नाईट लाईफच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. नाईट लाईफमुळे पोलिसांना रात्रीच्यावेळीही काम करावे लागेल. त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येईल. तसेच निवासी भागातील हॉटेल आणि बार सुरु ठेवण्यासही भाजपने विरोधी दर्शविला आहे. 

Read More